
अमेरिकेसोबत इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या दुसऱया फेरीच्या चर्चेला इराणने आज स्पष्ट नकार दिला. अमेरिकेच्या अवाजवी आणि अवास्तव अपेक्षा, सतत बदलणारी भूमिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्परविरोधी वक्तव्याचा हवाला देत इराणने हा निर्णय घेतला. ‘अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझच्या मुद्दय़ावरून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. आमच्या अधिकारांवर मर्यादा घालणारे ट्रम्प कोण,’ असा खडा सवालही इराणने केला.
इराण व अमेरिकेतील युद्धविरामाची मुदत पुढील आठवडय़ात संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा वाटाघाटीची तयारी सुरू होती. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचणार होते. ट्रम्प यांनी स्वतः तशी माहिती दिली. मात्र, चर्चेची रुपरेषा आम्हाला अपेक्षित अशी असेल तरच त्यात भाग घेऊ असे इराणने आधीच स्पष्ट केले होते. त्यांच्या त्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने इराणने चर्चेतून अंग काढून घेतले आहे.
आता आणखी सज्जन राहून चालणार नाही. इराणने करार स्वीकारला नाही तर जे आवश्यक आहे ते करू. गेल्या 47 वर्षांत अमेरिकेच्या इतर अध्यक्षांनी जे करायला हवं होतं, ते करण्याची संधी मला मिळणे हा माझा सन्मान समजेन.’
– डोनाल्ड ट्रम्प
रक्तपिपासू शत्रूविरुद्ध ठाम उभे राहा!
‘अमेरिकेच्या विरोधातील युद्ध आपल्याला सन्मानाने संपवायचे आहे. आपण केवळ आपल्या देशाचे संरक्षण करत आहोत. इराण युद्धखोर आहे असे चित्र निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. या रक्तपिपासू आणि क्रूर शत्रूविरुद्ध ठामपणे उभे राहा,’ असे आवाहन पेजेश्कियान यांनी इराणी जनतेला केले.
परिणाम भोगावे लागतील… हिंदुस्थानचा इशारा
होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱया हिंदुस्थानी जहाजांवर इराणने केलेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद आज उमटले. हिंदुस्थानने नवी दिल्लीतील इराणी उच्चायुक्तांना पाचारण करून तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा हिंदुस्थानने दिला. होर्मुझमधील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत असावी अशी आमची भूमिका असल्याचेही हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
होर्मुझ गोळीबारानंतर ट्रम्प यांची इराणला धमकी
‘कायमस्वरूपी शांतता करारासाठी आम्ही प्रस्ताव ठेवत आहोत. तो मान्य न केल्यास इराणमधील प्रत्येक पूल, वीज प्रकल्प उडवू. होर्मुझमध्ये इराणने केलेला गोळीबार हे युद्धविरामाचे उल्लंघन आहे. फ्रान्स आणि इंग्लंडच्या जहाजांना इराणने लक्ष्य केले. हे योग्य झाले नाही,’ असे ट्रम्प म्हणाले.
आम्हाला अणुहक्कांपासून रोखणारे ट्रम्प कोण?
ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी उत्तर दिले. इराण अण्वस्त्रसज्ज होऊ नये असे ट्रम्प म्हणतात, पण कारण सांगत नाहीत. आमच्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? इराणचे हक्क हिरावून घेणारे ट्रम्प कोण,’ असे पेजेश्कियान यांनी ठणकावले.




























































