सांगली, मिरज येथे गारांचा पाऊस; द्राक्ष- आंब्यांच्या बागांना बसणार फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली व मिरज शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. जवळपास अर्धा पाऊण तास झालेल्या या पावसाने संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

रविवार सकाळपासून हवेत कमालीची उष्णता होती. सायंकाळनंतर हवेत अचानक बदल झाला आणि आकाशात ढगांनी गर्दी केली. जोराचे वारेही वाहू लागले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबरच गारांचा वर्षावही झाला. शहरातील अनेक रस्त्यावर गाराच गारा दिसून येत होत्या. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची त्रिधातिरपिट उडाली. विशेषतः रस्त्यावर फळभाजी आणि इतर साहित्य विक्रेत्यांची धावपळ उडाली. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत ,वाळवा यासह अनेक तालुक्यात झाला. पावसामुळे अनेक भागात काही काळ विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. या उन्हाळी पावसाचा फटका प्रामुख्याने द्राक्ष आणि आंबा या पिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.