
पालिका निवडणुकीत मराठीबहुल भागात भाजपचा धुव्वा उडाला असताना पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचे नवनवीन डाव रचले जात आहेत. दादर बाजारात मराठी फेरीवाले व दुकानदारांची संख्या जास्त आहे. या मराठी व्यापाऱयांना ‘टार्गेट’ करुन महापालिकेने कारवाईचा वरवंटा फिरवल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या गाडय़ा दर 10 मिनिटांनी दादर बाजारात राऊंड मारून फेरीवाल्यांना हटवत आहेत. अधिकृत फेरीवाले-दुकानदारांवरही कारवाई केली जात आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, विरार, नवी मुंबई परिसरातून लोक खरेदीसाठी दादरमध्ये येतात. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसर नेहमीच गजबजलेला असतो. डिसिल्व्हा रोड, सेनापती बापट मार्ग, जावळे मार्ग, न. चिं. केळकर मार्ग, कबुतरखाना परिसर, फुल मार्पेटच्या दिशेने जाणारा रस्ता अशा मार्गांवर मराठी व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे. किंबहुना, फेरीवाल्यांमध्ये निम्म्याहून अधिक संख्या मराठी व्यापाऱयांची आहे. वाहतूक आणि पादचाऱयांना अडथळा येऊ न देता व्यवसाय करणाऱया मराठी दुकानदार आणि फेरीवाल्यांवर पालिकेने गेल्या काही दिवसांपासून कारवाई तीव्र केली आहे. दर 10 मिनिटांनी पालिका व पोलिसांच्या गाडय़ा रेल्वे स्थानक परिसरात फेऱया मारून कारवाईचा दंडुका उगारत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात आधीच नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यात पालिका आणि पोलिसांच्या गाडय़ांच्या वर्दळीने नागरिकांनाही ये-जा करण्यात अडसर येत असल्याचे चित्र रविवारी दादर बाजारपेठेत होते. वर्षानुवर्षे दादरमध्ये व्यवसाय करीत असल्याने फेरीवाल्यांचा मोठा ग्राहकवर्ग झाला आहे. येथील छोटय़ा-मोठय़ा व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया मराठी फेरीवाले आणि दुकानदारांना पालिकेच्या कारवाईने चिंतेत लोटले आहे. महापालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून न देताच कारवाईचा वरवंटा फिरवल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 2014 च्या सर्वेक्षणानुसार अनेकजण अधिकृत फेरीवाले आहेत. असे असूनही आपल्याला कारवाईचा फटका बसत असल्याचे मराठी व्यापाऱयांचे म्हणणे आहे.
1200 रुपयांचा दंड आणि सामानही जप्त
शहरातील इतर मार्पेटच्या तुलनेत दादरमध्ये मराठी दुकानदारांचे प्रमाण अधिक आहे. पालिकेने याच बाजारपेठेत कारवाई करून मराठी माणसांना हद्दपार करण्याचे कारस्थान रचले आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कारवाई केलेल्या फेरीवाल्याकडून प्रत्येकवेळी 1200 रुपयांचा दंड वसूल केला जातो. तसेच सामानही जप्त केले जाते. त्यामुळे घरी परतताना कमाई करून नेण्याऐवजी सगळे गमावून जाण्याची वेळ येते, अशी नाराजी शहापूरहून येणाऱया भाजी विव्रेत्या महिलेने व्यक्त केली.
महापालिकेने बांगलादेशी फेरीवाले हटवण्याच्या नावाखाली कारवाई सुरू केली. त्यासाठी सर्व फेरीवाल्यांची ओळखपत्रे तपासणे अपेक्षित होते. तसे न करता सरसकट कारवाई केली. त्यामुळे बांगलादेशींवर कारवाईची गोष्ट दूरच असून यात मराठी फेरीवाले आणि दुकानदार भरडले गेलेत, अशी प्रतिक्रिया दादरमध्ये वर्षानुवर्षे कपडय़ांचा व्यापार करणाऱया राम पासलकर यांनी दिली.
कारवाईच्या भीतीने पळापळ… गोंधळ…
पालिका आणि पोलिसांच्या गाडय़ा वारंवार राऊंड मारतात. अनेक फेरीवाले कपडय़ांवर सामान ठेवून धंदा करतात. मात्र समोर पालिका आणि पोलिसांची गाडी दिसताच कारवाईच्या भीतीने फेरीवाले आपले सर्व साहित्य गुंडाळून ऐन गर्दीतूनच पळापळ करतात. त्यातून गोंधळ आणि तणाव निर्माण होतो. त्यामुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहासाठी वेळीच पर्यायी व्यवस्था करावी आणि हा सर्व गोंधळ टाळावा, अशी मागणी जोर धरत आहे.



























































