
जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर येथील विमानतळावर अमेरिकेच्या दोन नागरिकांना सॅटेलाईट फोन सापडल्यानंतर अटक करण्यात आली आहे. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने त्यांची चौकशी केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जेफरी स्कॉट असे एका नागरिकाचे नाव असून त्याच्याच बॅगमधून सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला. तो अमेरिकेच्या मोंटाना राज्यातील रहिवासी आहे. विमानतळावर नियमित तपासणीदरम्यान दोन्ही अमेरिकन नागरिकांकडील सामान स्पॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सामानात गार्मिन पंपनीचा सॅटेलाइट फोन आढळला. त्यांना तत्काळ रोखून चौकशी करण्यात आली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी आग्रा येथेदेखील अमेरिकन पर्यटकांच्या एका गटाला सॅटेलाइट फोन बाळगल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते.
हिंदुस्थानात सॅटेलाइट फोनवर आहे बंदी
जेफरी स्कॉट याच्यासोबत आलेल्या नागरिकाची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. दोघे कोणत्या कामासाठी हिंदुस्थानात आले होते, याबाबत माहिती उघड झालेली नाही. हिंदुस्थानात सॅटेलाईट फोनचा वापर करण्यास बंदी आहे. ही माहिती न घेता परदेशी पर्यटक हिंदुस्थानात सॅटेलाइट फोन घेऊन येतात.



























































