
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने हिंदुस्थानमध्ये आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदाच्या हंगामात राशिदला आतापर्यंत आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अशातच तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘राशिद खान- फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ या त्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलियाने आपल्याला नागरिकत्व देऊन आपल्या देशाकडून खेळण्याची ऑफर दिली होती. मात्र मायदेशावरील प्रेमापोटी या ऑफरला आपण नम्रपणे नकार दिला, असे राशिद खान म्हणाला.
राशिद खान याने आपल्या पुस्तकामध्ये 2023 च्या आयपीएल हंगामातील एक प्रसंग सांगितला आहे. एका संघ अधिकाऱ्याने त्याला सांगितले की, हिंदुस्थानी क्रिकेटमधील वरिष्ठ व्यक्तीला त्याला भेटायचे आहे. या भेटीदरम्यान त्या व्यक्तीने मला हिंदुस्थानी नागरिकत्वाची ऑफर दिली.
तुझ्या देशातील परिस्थिती सध्या खूप बिकट आहे. तू हिंदुस्थानात येऊन का राहत नाहीस? आम्ही तुला हिंदुस्थानची कागदपत्रे आणि नागरिकत्व देऊ. तू इथेच राहा आणि इथूनच क्रिकेट खेळ, अशी ऑफर मला देण्यात आल्याचे राशिदने म्हटले. या प्रस्तावाने राशिद काही काळ चकित झाला होता. मात्र त्याने नम्रपणे ही ऑफर नाकारली आणि अफगाणिस्तानसाठी खेळत राहणार हे देखील स्पष्ट केले.
दरम्यान, हिंदुस्थानच नाही तर ऑस्ट्रेलियानेही राशिदला अशाच प्रकारची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी राशिद आपल्या निर्णयावर ठाम राहिला होता. जर मी माझ्या देशासाठी खेळू शकलो नाही, तर मी जगातील इतर कोणत्याही देशासाठी खेळणार नाही. दुसऱ्या देशासाठी खेळण्यापेक्षा क्रिकेट सोडणे पसंत करेन, असे राशिदने स्पष्ट केले होते.
राशिदच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
मैदानावर आपल्या गुगलीने भल्याभल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या राशिद खानच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राशिद बाबा झाला असून त्याने सोशल मीडियाद्वारे ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राशिदने इंस्टाग्रामवर मुलाचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच एका लाकडी पाटीवर ‘Hello World, My Name is Azlan Khan’ असे लिहिलेले दिसत आहे.























































