
विज्ञानाच्या आणि संगणकाच्या झंझावातातही ज्या परंपरेवर उभ्या महाराष्ट्राचा आणि शेजारच्या राज्यांचा अढळ विश्वास आहे अशा प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचा विधी यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बु. येथे चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी निष्ठेने जपली आहे. रविवारी सायंकाळी वाघ यांच्या शेतात 18 प्रकारची धान्ये, करवा आणि नैवेद्य यांची शास्त्रोक्त मांडणी करण्यात आली होती. आज पहाटे या मांडणीतील बदलांचे निरीक्षण करून जगाच्या पोशिंद्यासाठी अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली.
पावसाचे भाकीत – यंदाच्या पर्जन्यमानाबाबत घट मांडणीतून संमिश्र संकेत मिळाले आहेत
सुरुवात – पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी असेल.
मध्य व उत्तरार्ध – दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण, तर तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहून अतिवृष्टीचे संकेत आहेत. चौथ्या महिन्यातही पाऊस चांगला राहील.
चिंतेची बाब – यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण भरपूर राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
पिकांचे भविष्य – यंदा 18 प्रकारच्या पिकांपैकी काही पिकांची स्थिती जबरदस्त राहणार आहे. ज्वारी, बाजरी आणि तीळ ही पिके यंदा सरस ठरणार असून त्यांचे उत्पादन चौफेर आणि समाधानकारक होईल. कपाशीची स्थिती मध्यम स्वरूपाची असून उत्पादनात फार मोठी घट किंवा वाढ न होता ते स्थिर राहील. तूर, हरभरा व वाटाणा या पिकांची स्थिती ‘मोगम’ (अनिश्चित) असल्याने शेतकऱ्यांमध्ये धाकधूक कायम असेल. मूग व अंबाडी या पिकांचे उत्पादन सर्व बाजूंनी बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत.
भेंडवळच्या या ‘ओपन एअर लॅबोरेटरी’ मधून देशाच्या स्थितीवरही भाष्य करण्यात आले त्यामध्ये “राजा कायम आहे आणि पानविडा स्थिर आहे,” यावरून राजकीय स्थितीत स्थिरता राहण्याचे संकेत आहेत. सीमेवरील संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. देशाची आर्थिक स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यंदा स्थिर राहण्याचे चिन्ह आहे. या सोहळ्यासाठी केवळ विदर्भच नव्हे, तर खान्देश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकरी भल्या पहाटे भेंडवळमध्ये दाखल झाले होते. केवळ शेतकरीच नव्हे, तर राज्यभरातील माध्यम प्रतिनिधी आणि नामांकित बीज उत्पादक कंपन्यांचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. 350 वर्षांची ही परंपरा आजच्या काळातही हवामान अंदाजाला एक समांतर दिशा दाखवत असल्याचे दिसून येते.

























































