
अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्याचे वाढते दर पाहता ते ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी 99,500 रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या किमतीत आज थोडी कपात होऊन भाव 1,53,000 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
जागतिक बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोन्याची चमक आणखी वाढेल असा तज्ञांचा अंदाज आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोने कडाडेल. अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या किमतीत एक ते दोन हजारांची वाढ होईल, असा अंदाज आहे. त्यानंतरच्या काही महिन्यांत सोने 1 लाख 75 हजारांचा पल्ला गाठेल, अशीही शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. आकाशाला भिडलेले सोने काही महिन्यांपूर्वी अचानक खाली यायला सुरुवात झाली. त्यात पुन्हा आस्ते कदम वाढ होताना दिसत आहे. आखाती युद्धाच्या युद्धबंदीनंतर सोने 10 ग्रॅम मागे सुमारे 5500 रुपये एवढे वाढले आहे. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून आणि ज्वेलर्सकडून सोन्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे दर वाढण्याचा अंदाज आहे.
युद्धबंदी झाल्यापासून सोन्याच्या दरात प्रति तोळा साडेपाच हजारांपर्यंत वाढ झाली आहे. लोकांचा सोन्यावरचा विश्वास कायम आहे. ही सुरक्षित गुंतवणूक वाटते. अक्षय्य तृतीयेला एक ते दीड हजाराने सोने वाढेल, असे पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर यांनी सांगितले.
दरवाढ कशामुळे?
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वाढलेली मागणी किमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. याशिवाय अमेरिका-इराण शांतता चर्चेमुळेदेखील दरवाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानले जाते. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. पुढील काही महिन्यांत सोने 1 लाख 75 हजारांच्या पार जाईल, असा अंदाज जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे कुमार जैन यांनी वर्तवला.




























































