
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी जागतिक वारसास्थळांच्या सद्यस्थितीवर भाष्य करत सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. अजिंठा आणि वेरूळ ही लेणी केवळ वास्तू नसून हिंदुस्थानी कलेला जागतिक क्षितिजावर नेणारी लेणी नसून आपल्या समृद्ध संस्कृतीचे जिवंत पुरावे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 1983 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवणारी ही देशातील पहिली ठिकाणे असून, आज देशातील वारसा स्थळांची संख्या 44 वर पोहोचली असली तरी या ‘पहिल्या’ वारसा स्थळांचे महत्त्व आजही अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे. ‘दुर्दैवाने जागतिक दर्जाचा वारसा जपण्यात आणि पर्यटकांना सुविधा देण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. या परिसरात सध्या अनेक गंभीर समस्या उभ्या असून अजिंठ्याला जाण्यासाठी पर्यटकांना 3 ते 4 तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला जोडणारा एक साधा ‘4 पदरी’ रस्ता सरकार गेल्या अनेक वर्षांत देऊ शकले नाही, ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रस्त्यांच्या दुर्दशेसह दळणवळणाच्या इतर समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. मुख्य पार्किंगपासून लेणीपर्यंत नेणाऱ्या एसटी बसेसची अवस्था अत्यंत ‘भंगार’ असून चालकांची मनमानी आणि बसेसचा अभाव यामुळे परदेशी पर्यटकांमध्ये देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले. तसेच जागतिक वारसा स्थळ असूनही लेणी परिसरात स्वच्छतेचा अभाव आणि ठिकठिकाणी पसरलेला कचरा ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. पर्यटकांच्या सोयीचे असलेले ‘उदयपूर-संभाजीनगर’ सारखे विमान मार्ग बंद झाल्याने पर्यटनाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजिंठा-वेरूळ: जागतिक वारसास्थळांची मुहूर्तमेढ रोवणारी ठिकाणे
अजिंठा आणि वेरूळ… भारतीय कलेला जागतिक क्षितिजावर नेऊन ठेवणारी ही केवळ लेणी नाहीत, तर आपल्या समृद्ध संस्कृतीचे जिवंत पुरावे आहेत. १९८३ साली युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारी ही… pic.twitter.com/r2FqcQPBNB
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 18, 2026
इतकी सरकारी अनास्था असूनही केवळ येथील अजोड कलाकृतींच्या ओढीने जगभरातील कलाप्रेमी आजही इथे येतात. हा वारसा आणि कला टिकली पाहिजे व वाढली पाहिजे, अशी भावना व्यक्त करत अंबादास दानवे यांनी जागतिक वारसा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.























































