
रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेच्या कारभाराचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली आणि सुमारे साडेतीन कोटी रुपये बाजारमूल्य असलेली सौ. विमलबाई कन्याशाळेची इमारत एका धनदांडग्या व्यापाऱ्याला अवघ्या एक रुपया महिन्याच्या भाड्याने आंदण देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या या कारनाम्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
30 नोव्हेंबर 1993 रोजी कुमुद शरद मेहेंदळे यांनी आपल्या कुटुंबाची ही अमूल्य वास्तू केवळ एका उदात्त हेतूने नगरपालिकेला दान दिली होती. ‘या वास्तूत फक्त सौ. विमलबाई मेहेंदळे यांच्या नावाने कन्या शाळा चालवावी,’ ही मुख्य अट त्या बक्षीसपत्रात होती. मात्र प्रशासनाने या अटीला केराची टोपली दाखवत चक्क व्यापारीकरणाचा घाट घातला. तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी 6 ऑक्टोबर 2023 च्या सर्वसाधारण सभेत या संस्थापुढे उघडपणे मंजुरी दिली.
विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अवघ्या काही तास आधी हा 30 वर्षांचा दीर्घमुदतीचा भाडेपट्टा करार झटपट करण्यात आला. हसमुख जैन यांच्या रोहा वेलफेअर ट्रस्टला एक रुपया मासिक भाडेतत्त्वावर ही इमारत देण्यात आली आहे. याबाबत जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
एक लाख भाडे अपेक्षित
नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात रोहा सिटिझन फोरमने आवाज उठवला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये नगररचना विभागाच्या त्रिस्तरीय समितीने या इमारतीचे प्रतिमहिना एक लाख 8 हजार रुपये इतके भाडे निश्चित केले होते. तरीही साडेतीन कोटींची सरकारी मालमत्ता प्रशासनाने कवडीमोलाने खासगी व्यक्तीला आंदण दिली. ज्या शाळेत गरीबांच्या मुलींनी शिकावे तिथे व्यापाऱ्यांचे हित जपले जात आहे. दरम्यान रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी ‘रुपयाभराच्या व्यवहाराचा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरू,’ असा इशारा दिला आहे.





























































