महिला आरक्षणासोबत मतदारसंघ पुनर्रचना जोडण्याचा भाजपचा अजेंडा अपयशी ठरला, काँग्रेस खासदार के.सी.वेणुगोपाल यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस खासदार के.सी.वेणुगोपाल यांनी शनिवारी म्हटले की, महिला आरक्षणाला विरोधकांचा ठाम पाठिंबा कायम आहे. मात्र संविधान (131वे दुरुस्ती) विधेयकावर चर्चा करताना केंद्र सरकारने महिला आरक्षणाचा मुद्दा सीमांकनाशी जोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

वेणुगोपाल यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आमचा मुख्य आक्षेप हा दोन वेगळ्या मुद्द्यांना एकत्र करण्यावर होता. महिला आरक्षण कधीच अपयशी ठरले नाही, तर सीमांकनाशी त्याचा जोडण्याचा सरकारचा अजेंडा अपयशी ठरला.”

त्यांनी पुढे आरोप केला की, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया राजकीय हेतूने आणि सोयीप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. “आसाम आणि जम्मू-काश्मीरप्रमाणेच मतदारसंघांची रचना आपल्या सोयीने बदलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. हा डाव काल संसदेत हाणून पाडण्यात आला,” असे ते म्हणाले.

वेणुगोपाल यांनी “50 टक्के फॉर्म्युला” संदर्भातही प्रश्न उपस्थित केले. “जर खरोखर काही हमी द्यायची होती, तर सरकारने अधिकृत दुरुस्ती विधेयक आणायला हवे होते. अशी कोणतीही ठोस हमी दिली गेली नाही,” असे त्यांनी नमूद केले.

तसेच त्यांनी महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. “सध्याच्या 543 लोकसभा जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध नसून, ते मतदारसंघ पुनर्रचना आणि इतर मुद्द्यांशी जोडण्याच्या प्रक्रियेविरोधात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.