
यवतमाळ शहरातील अप्सरा टॉकीजलगत असलेल्या गादी पिंजनालयाला शनिवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पिंजनालयातील संपूर्ण साहित्य, मशिनरी तसेच एक वाहन जळून खाक झाले असून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल नसिर अब्दुल रऊफ यांचे अप्सरा टॉकीज परिसरात गादी पिंजनालय व गोदाम आहे. दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पिंजनालयात मोठ्या प्रमाणात कापूस व ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण कारखान्याला भस्मसात केले. धुराचे लोट दूरवरून दिसत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. या आगीत कापसाच्या गाठी, मशिनरी, तयार माल तसेच एक वाहन पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विद्युत शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.




























































