
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तिने हिंदुस्थानला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याचा विक्रम मोडला. रोहितला मागे टाकत स्मृतीने हिंदुस्थानसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.
आगामी टी-20 वर्ल्डकपची तयारी म्हणून हिंदुस्थानचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळला गेला. या लढतीत स्मृतीने 13 धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र या खेळीदरम्यान तिने एक असा विक्रम केला जो आतापर्यंत हिंदुस्थानच्या कोणत्याच पुरुष किंवा महिला खेळाडूलाही शक्य झाला नव्हता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक धाव घेताच स्मृतीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (4,244 धावा) करणारी हिंदुस्थानी खेळाडू म्हणून नोंद झाली आहे. रोहित शर्माने टी-20 कारकिर्दीत 4,231 धावा केल्या होत्या. स्मृतीने 161 सामन्यांत 30.31 च्या सरासरीने हा टप्पा ओलांडला असून तिच्या नावावर 1 शतक आणि 33 अर्धशतके आहेत.
A #TeamIndia vice-captain Smriti Mandhana now has the most runs by any Indian batter in T20Is
Take a bow! ♀️
Updates ▶️ https://t.co/gQymmRhJci#SAvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/pNjgxtkYyw
— BCCI Women (@BCCIWomen) April 17, 2026
रोहितचा दबदबा मोडला
रोहित शर्माने 2024 चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. हिंदुस्थानकडून सर्वाधिक टी-20 धावा करणाऱ्याचा विक्रम बऱ्याच काळापासून त्याच्या नावावर होता. मात्र आता स्मृतीने त्याला मागे सोडले असून महिला क्रिकेटसाठीही हा आनंदाचा क्षण ठरला आहे.
डबरनमध्ये पराभव
डरबनमध्ये झालेल्या या सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी हिंदुस्थानला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघींनी 5 षटकांत 46 धावांची भागीदारी केली. स्मृतीने यादरम्यान क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर मारलेला षटकार प्रेक्षणीय होता. मात्र, मोठा शॉट मारण्याच्या नादात ती 13 धावांवर बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या 47 आणि जेमिमा रॉड्रिग्स हिच्या 36 धावांच्या बळावर हिंदुस्थानने 20 षटकात 7 बाद 157 धावा केल्या. या धावांचा दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. लॉरा वोलफार्टने सर्वाधिक 51, तर ॲनेरी डेर्कसेन हिने नाबाद 44 धावांचे योगदान दिले.
Smriti Mandhana climbs to the summit as India’s highest run-scorer in T20Is pic.twitter.com/QGsVRzTiX3
— ICC (@ICC) April 18, 2026




























































