
अमेरिका, इस्रायल इराण यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली असून कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगाने हाचलाची सुरू आहेत. आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली असून सर्व व्यापारी जहाजांना त्यातून जाण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की इराण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा कधीही बंद करणार नाही. तसेच इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चेच्या बैठकांची दुसरी फेरीही सुरू आहे. या सर्व जागतिक घडामोडींचा सोनेचांदीच्या दरावरही परिणाम होत आहे.
जागतिक तणाव निवळण्याचे संकेत मिळत असल्याने शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठा बदल झाला. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. जागतिक बाजारात चांदीच्या दरात ४% वाढ झाली आहे. जागतिक तणाव निवळत असल्याने शेअर बाजारापासून ते कमोडिटी बाजारापर्यंत सर्वत्र दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकन बाजारात मोठी तेजी दिसून आली असून सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही लक्षणीय बदल झाले आहेत. जागतिक कमोडिटी बाजार आणि देशांतर्गत एमसीएक्स (MCX) बाजार या दोन्ही ठिकाणी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याच्या बातमीनंतर, जागतिक कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. सोन्याची किंमत १.४८% ने, म्हणजेच प्रति औंस $७१.३० ने वाढून, प्रति औंस $४,८७९.६० वर पोहोचली. त्याचप्रमाणे, चांदीच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली, ती ३.९८% ने, म्हणजेच $३.१३२ ने वाढून, प्रति औंस $८१.८४२ वर पोहोचली.
वायदे बाजारातही सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली. एमसीएक्सवर ५ मे च्या फ्युचर्समधील सोन्याचा भाव ०.९७% किंवा १,४७८ ने वाढून प्रति १० ग्रॅम १,५३,२४० वर बंद झाला. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. ५ मे च्या वायद्यांनुसार चांदीचे दर ३.८०% नी, म्हणजेच ९,४५१ ने वाढून २,५८,०७९ प्रति किलो झाले. दिवसभरात सोन्याच्या दरात जवळपास २,००० आणि चांदीच्या दरात ११,००० ने वाढ झाली.
सराफा बाजारात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम १.५१ लाखांपेक्षा जास्त आहे. २३-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.५० लाखांपेक्षा जास्त आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.३९ लाख आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव १.१४ लाख आहे. चांदीचा भाव प्रति किलो २.४९ लाख होता. जागतिक घडामोडींमुळे सोमवारी वायदे आणि सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीही वाढू शकतात.





























































