पंतप्रधान मोदी संसदेत आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कालच्या संसदीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी दावा केला की, पंतप्रधान आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत आणि विरोधकांना सामोरे जाणे टाळले, कारण ते अमेरिकेच्या दबावाखाली आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या काही करारांमुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेवर, डेटा सुरक्षेवर आणि शेतकऱ्यांच्या हितांवर परिणाम होऊ शकतो. “आज देशाचे निर्णय स्वतंत्रपणे घेतले जात नाहीत, तर बाह्य दबावाच्या छायेखाली घेतले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

या संदर्भात त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत म्हणाले की, ट्रम्प यांच्याकडे काही संवेदनशील माहिती असल्यामुळे ते पंतप्रधानांवर प्रभाव टाकत आहेत. तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही त्यांना माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी पुढे आरोप केला की, जसा केंद्राच्या निर्णयांवर बाहेरचा प्रभाव पडत आहे, तसाच प्रभाव आता राज्यांच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. “तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.