वेधक – क्रिकेटच्या मैदानावर मालवणीचा बोलबाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर, [email protected]

गोलंदाजी आणि फलंदाजीदरम्यान फटकेबाजीचा योग्य मेळ साधत समालोचनातून लाडक्या बोलीभाषेचा प्रचार करणारे सिंधुदुर्गात वालावलमधील बादल चौधरी यांच्या आगळ्या कामाचा हा परिचय.

‘येळ बरो तेचो खेळ बरो’, ‘बैल गेलो तो गेलो जाताना नऊ हाताचो कासरो घेवन् गेलो’, ‘खटक्यार बॉट नि जाग्यार पलटी,’ असे एक ना एक मालवणी म्हणी, वाक्प्रचार सध्या क्रिकेटच्या मैदानावर हास्याचे फवारे उडवत क्रीडारसिकांना खिळवून ठेवत आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीदरम्यान फटकेबाजीचा योग्य मेळ साधत समालोचनातून लाडक्या बोलीभाषेचा प्रचार सिंधुदुर्गात वालावलमधील बादल चौधरी करत आहेत.

मालवणी बोलीच्या प्रचारात हास्यसम्राट मच्छिंद्र कांबळी, दशावतारी नटसम्राट मी स्वत मालक कशी ओळख सांगणारे बाबी कलिंगण, बाबी नालंग या कलावंतांसह अनेक साहित्यिक, लेखक, कवी यांचा समावेश आहे. आता क्रिकेटच्या मैदानावर मालवणीचा बोलबाला दिसत असून बादल चौधरी यांनी ही एक सुरुवात केली आहे. कुडाळ तालुक्यातील वालावल गावात 1988 साली प्राथमिक शाळेत असताना आईने लिहून दिलेल्या लोकमान्य टिळक यांच्या भाषणामुळे बादल यांचे सर्वांसमोर बोलण्याचे धाडस निर्माण झाले. स्वतला क्रिकेट खेळण्याची मोठी आवड आणि त्याचबरोबर समालोचन करण्याचे वेड असल्यामुळे घरच्या सातेरी भाटला मैदानावर केलेली मालवणी कॉमेंट्री व त्यानंतर वेंगुर्ले तालुक्यातील कर्ली सातेरी मैदानावर पुढील संधी मिळाली.  प्रत्येक फलंदाजाच्या फटक्याप्रमाणे किंवा गोलंदाजीदरम्यान टाकलेल्या विशिष्ट चेंडूला समर्पक अशा मालवणी वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग केल्यामुळे पुणे, मुंबईतील आयोजक भलतेच खूश झाले.

पुढील वर्षीही त्याच ठिकाणी चौधरी यांनी केलेले मालवणी समालोचन सर्वांनाच भावले. दरम्यान, मालवण तालुक्यातील देवली येथील तत्कालीन सरपंच श्याम वाक्कर यांनी मालवण बोर्डिंग मैदानावर चौधरी यांच्या समालोचनासाठी पुढाकार घेतला. यादरम्यान बीइंग मालवणी पेजवर चार मिनिटांची व्हिडीओ क्लिप प्रमोद आचरेकर यांनी रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकली आणि ती भलतीच व्हायरल झाली. वालावल, कर्ली, मालवण असा प्रवास करत बादल चौधरी यांची गोवा राज्यात एण्ट्री झाली. गोव्यातील हरमल, मडगाव, वास्को, फोंडा, पेडणे या प्रत्येक ठिकाणी गोयकरांनी बादल यांना समालोचनासाठी निवडत मानसन्मान दिला.

मोठमोठय़ा चषकांच्या सामन्यांसाठी समालोचन करताना सिंधुदुर्ग जिह्यात एखाद्या लहानशा टुर्नामेंटसाठी बोलवले तरी चौधरी आवर्जून उपस्थित राहू लागले. आपल्या आजीकडून मालवणी भाषेचा पुरेपूर ‘साठा’ संग्रहित केला आहे. वालावल बाजारपेठेत चौधरी यांच्या दुकानात त्या वेळी वृद्धमंडळी खरेदीसाठी यायची. एसटीची वाट पाहत बसायची. त्यांच्या बोलण्यातील शब्दांचे स्टॉक बादल यांनी निवडले.

सुप्रीमोने मानसन्मान दिला

मुंबईतील सांताक्रुझमध्ये होणाऱया सुप्रीमो चषक स्पर्धेने खरा मानसन्मान मिळवून दिल्याचे चौधरी आवर्जून सांगतात. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आमदार संजय पोतनीस यांच्यामार्फत आयोजकांचे आमंत्रण आले आणि हिंदुस्थानातील दहा दिग्गज समालोचकांसमवेत कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली.

350 म्हणींचा स्टॉक

आयपीएलमुळे काही म्हणी सुचवल्या गेल्या. काही नवीन वाचण्यात आल्या. थोडय़ा जुन्या मालवणी म्हणींना पॉलिश करत जातिवाचक शब्द बदलून टाकले आणि त्याला वेगळे रूप दिले. त्यामुळे जवळपास बादल यांच्याकडे 350 म्हणी आहेत. सीमेवर जो प्रेक्षक सामना पाहण्यासाठी बसला असेल, मैदानावर जे घडत आहे आणि नेमके प्रेक्षकाच्या मनात काय आहे हे जाणूनच त्यादरम्यान म्हणींचा वापर केला जातो. त्यामुळे सामना पाहण्याची रंगतही वाढते.

उत्कृष्ट निवेदक

कुडाळ शहरातील नावाजलेला लाजरी, आंदुर्ले महोत्सव, चपई नृत्य, भजन स्पर्धा, खेळ पैठणी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, रस्सीखेच स्पर्धा, रापण महोत्सव, वेंगुर्ले महोत्सव, लायन्स फेस्टिव्हल यांसारख्या मोठमोठय़ा महोत्सवात स्टेज सांभाळण्याचे काम चौधरी यांनी केले आहे. दशावतार नाटय़ महोत्सव, बॉडी बिल्डिंग, कबड्डी स्पर्धा यांसह विविध ठिकाणच्या कार्यक्रमाचे निवेदन बादल उत्कृष्टरीत्या करत आहेत.