तंजावरचे स्थलमहात्म्य – प्रयोगशील नाटककार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव, [email protected]

तंजावरच्या प्रतापसिंहराजे भोसले यांनी आपल्या राजवटीत नाट्य, काव्य, साहित्य यांची जोपासना केली. नाट्यकथा रचना प्रथमत हाताळण्याचा मान त्यांनाच मिळतो. प्रतापसिंह राजेंनी आपला पारंपरिक सांस्कृतिक वारसा निष्ठेने जोपासण्याचा व त्यास समृद्ध करण्याचा निश्चित असा प्रयत्न केला.

प्रतापसिंहराजांचे कलाक्षेत्रातील काम  वाखाणण्याजोगे आहे. लष्करी कारवाईत व्यस्त असतानासुद्धा प्रतापसिंहराजांनी आपल्या राजवटीत साहित्यादी कलांची जोपासना केली. त्यांच्या दरबारात संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि मराठी या भाषांमधील विद्वान पंडितांची गर्दी होती. त्यांनी विविध विषयांवर संस्कृत व मराठी भाषेत पुराणे, नाटकांची निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या नाटकांचा आआधीच्या लेखामधून घेतला आहे.

त्यांनी लिहिलेली ‘श्रीसीताकल्याण’ व ‘उषापरिणय’ (प्रतापसिंहराजे) ही दोनही नाटके विवाहकथा अभिनीत करत असली तरी इतर नाटकांप्रमाणे ती तेवढ्यापुरतीच मर्यादित नाहीत. या दोनही नाटकांमध्ये काही विशिष्ट प्रसंगातून सामाजिक-सांस्कृतिक, नीतिविषयक प्रश्न गुंफले गेले आहेत आणि त्याविषयीची मते पात्र-पात्रसंवादांतून अभिव्यक्त झाली आहेत. प्रस्तुत नाटकांमधून स्त्रीपात्रांच्या मानसिक पातळीवरील काही संदर्भ मुखरित झाले आहेत. या नाटकांमध्ये उपवर मुलीच्या मनातील कामभाव ‘स्वप्न’ या माध्यमातून  सहजपणे व्यक्त केलेला दिसतो. प्रतापसिंहराजांनी ‘प्रभावती परिणय’ या नाटकाच्या माध्यमातून मराठीमधील पहिले गर्भ नाटक लिहिले. तसेच ‘जानकीसुखोल्लास’ हे तामिळनाडूमध्ये प्रचलित असलेल्या कोरवंजी नामक लोकनृत्य-नाट्यप्रकारातले पहिले मराठी नाटक लिहले. या नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘मुद्राराक्षस’ नाटक लिहून प्रथमत नाट्यकथा हा एक रचनाप्रकार हाताळला.

इंग्रजी भाषेचे आगमन होण्यापूर्वीही ‘नाट्यकथा’ नावाचा एक स्वतंत्र रचना प्रकार मराठी वाङ्मयात प्रथमत राजे प्रतापसिंह यांनी सुरू केला. ही कथा ओवीबद्ध असून त्यात साडेसहाशे ओव्या आहेत. डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या मते या नाट्यकथेचा निर्मिता राजे प्रतापसिंह नसून त्यांच्या राजदरबारातील आश्रित कवी आहे. डॉ. म.रा. जोशींनी तंजावरला जाऊन या नाट्यकथेच्या प्रती मुळातून तपासल्या तेव्हा त्यांना असे दिसून आले की, याचा कर्ता प्रतापसिंहच आहेत. डॉ. ईश्वर सोमनथे यांनीही नाट्यकथा निर्मितीचा काळ आणि नाट्यकथेतील संदर्भ तपासून ही नाट्यकथा प्रतापसिंहराजे यांचीच असल्याचे विवेचन केले आहे.  म्हणून ‘मुद्राराक्षस कथा’ याचे कर्ते प्रतापसिंहराजे ठरतात. मुद्राराक्षस नाटक कथाप्रमाणेच ‘प्रबोधचंद्रोदय’ ही कथा लिहिण्यात आली. यामुळे कथा हा एक अभिनव असा रचना प्रकार मराठी साहित्यात उदयाला आला याचे श्रेय राजे प्रतापसिंह भोसले यांच्याकडे जाते.

प्रतापसिंहराजांनी नाटकांप्रमाणेच काव्यरचनाही केली आहे. स्यमंतकोपाख्यान, श्रीरामदिनचर्या, गोपीवस्त्रहरण, कृष्णमंजरी, मंदन संजीवन, रासक्रिडा या  काव्यग्रंथांची आणि काही  स्फूट स्वरूपाची पदरचनेची निर्मिती त्यांनी केली. ज्याप्रमाणे  सामराज, आनंदतनय व रघुनाथपंडित यासाख्या मराठी पंडित कवींनी अभिजात परंपरा मराठी साहित्यात आणली. त्याच परंपरेचा पुरस्कार प्रतापसिंहराजे भोसले यांनीही केलेला दिसतो. नाटक व काव्य या दोन रचनांसोबत केदारमाहात्म्य, ऋषिपंचमीव्रत, इंद्रिय जय कथन, अनंतव्रतकथा, गौरीव्रत या पुराणांची निर्मिती त्यांनी केली. प्रतापसिंहांनी स्फूट काव्यापेक्षा नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. भोसले राजांनी लिहिलेली बहुतेक नाटकं ही ‘भागवतमेळा’ या तामिळनाडूतील लोकनाट्य  प्रकारातील होती. आजही प्रतापसिंहच्या नाटकांचे प्रयोग मेलाट्टूरमध्ये नृसिंह जयंतीच्या वेळी ‘भागवतमेळा नाटकम’ म्हणून सादर केले जातात.

प्रतापसिंह हे धर्मनिष्ठ होते. रामदासी परंपरेचा स्वीकार त्यांनी केला होता. सेतुराज रामदासी हे त्यांचे गुरू होते. अनंत मौनी – मेरुस्वामी – सेतुराजस्वामी – प्रतापसिंह भोसले अशी त्यांची पारमार्थिक परंपरा सांगता येते. प्रतापराम असे सांप्रदायिक नाव त्यांनी धारण केले होते. आजही तंजावरमध्ये कामाक्षी मंदिराशेजारी प्रतापराम नावाचे मारुती मंदिर दिसून येते. प्रतापसिंहांच्या काळात भीमस्वामी शहापूरकर हे समर्थाचे शिष्य खुद्द तंजावरला मठ करून राहत होते. तसेच माधवस्वामी व रामपंडित हे दोघेही पिता-पुत्र त्यांच्याच काळात तंजावरला स्थायिक होते. माधवस्वामी पुत्र रामपंडिताला प्रतापसिंहाने आपल्या राजसभेत मानाचे स्थान दिले होते. प्रतापसिंहराजे भोसले यांच्या सर्व कार्यांचा आघेतल्यास असे लक्षात येते की, प्रतापसिंहांनी आपला पारंपरिक सांस्कृतिक वारसा निष्ठेने जोपासला आणि त्यास समृद्ध करण्याचा निश्चित असा प्रयत्न केला.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)