तेव्हा स्वत:ची पाठ थोपटून घेणारे, आता गप्प का? अर्थव्यवस्थेच्या घसरणीवरून रोहित पवारांची केंद्र सरकारवर बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानची घसरण आता सहाव्या क्रमांकावर झाली असून युके आणि जपानने हिंदुस्थानला मागे टाकले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था वधारेल असा अंदाज येतो तेव्हा वाहवा करून घेणारे सरकार, आता घसरण झाल्यावर गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या वर्षी हिंदुस्थानचौथी अर्थव्यवस्था होईल असा अंदाज वर्तवला होता, तेव्हा केंद्र सरकारने देशभर स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, आता त्याच IMF ने हिंदुस्थानसहाव्या स्थानावर घसरल्याचा अंदाज वर्तवला असताना सरकार मौन बाळगून आहे. सरकारच्या धरसोडीच्या आणि ‘व्होलेटाईल’ धोरणांमुळेच अर्थव्यवस्थेला हा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडून या घसरणीसाठी जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत हे कारण दिले जात आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा यामुळे अचूकता येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आज अपयश झाकण्यासाठी त्याच पद्धतीवर खापर फोडले जात आहे, हे दुर्दैवी आहे. यावेळी रोहित पवार यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची यादीच सादर केली.

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची सहाव्या स्थानावर घसरण, रुपया कमकुवत झाल्याने जीडीपीला फटका

केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव यामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.