
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत संसदेत मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. शनिवारी चेन्नई दौऱ्यावर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, “काल संसदेत भाजपने नवीन विधेयक आणले आणि ते महिला विधेयक असल्याचे सांगितले. पण महिला आरक्षणाचे विधेयक त्यांनी आधीच 2023 मध्ये मंजूर केले आहे.” त्यांनी पुढे आरोप केला की, या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना राबवून तामिळनाडूसह दक्षिणेकडील राज्ये, लहान राज्ये आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रस्तावाला विरोधकांनी एकजुटीने विरोध करत तो हाणून पाडल्याचा दावा करत त्यांनी ठामपणे सांगितले, “हिंदुस्थानच्या ‘idea of India’—म्हणजेच ‘हिंदुस्थान या संघराज्यात्मक संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे विधेयक पराभूत केले. संविधान स्पष्ट सांगते की हिंदुस्थान ही राज्यांची संघटना (Union of India) आहे. प्रत्येक राज्याला आपला आवाज असावा, आपली भाषा मोकळेपणाने व्यक्त करता यावी आणि आपली परंपरा जपता यावी.”
पंतप्रधान नरेंद्र मोती यांच्यावर टीका करताना गांधी म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान ‘एक देश, एक नेता, एक भाषा, एक जनता’ असे म्हणतात, तेव्हा ते संविधानावर थेट आघात करत असतात. भाजप आणि संघ काय करण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या.”
भाजप तामिळ भाषा आणि इतिहासावर हल्ला करू इच्छितात. तामिळ संस्कृती विकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते कधीच होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. भाजप आणि संघ यांना तामिळ ओळखीचे महत्त्व समजत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांना “अज्ञान” असे संबोधले.























































