मनतरंग – हट्टी आहे ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या सौदागर

मोठ्यांच्या आपापसांतील वादविवादांमध्ये जेव्हा लहान मुलांना ओढलं जातं तेव्हा मुलं ही काही वेळा चिथवली जातात आणि त्या वादाची पार्श्वभूमी लक्षात न घेता स्वतच प्रश्न सोडवायला जातात. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन ती हट्टी व रागीट होतात.  

अपूर्वा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. अत्यंत सुखवस्तू घरात जन्माला आलेली असल्याने आणि पाहिजे ते पाहिजे त्या वेळी मिळाल्याने ती थोडीफार लहानपणापासूनच स्वतचा जास्त विचार करणारी अशी होती. तिचे आई-वडील दोघेही खासगी कंपन्यांमध्ये नोकरीला होते. त्यामुळे अपूर्वा स्वतंत्रपणे स्वतचं आवरून, जेवून वगैरे शाळेला जात होती. तिचा मित्रपरिवारही चांगला होता. यंदाचं तिचं दहावीचं वर्ष असल्याने ती जोमाने अभ्यासही करत होती. अभ्यासात प्रगती, वागायलाही व्यवस्थित, बोलकी अशी अपूर्वा हल्ली हल्ली मात्र तिच्या आई-वडिलांशी उद्धटपणे वागायला लागली होती. विशेषत आईशी तिचे खटके जास्त उडायचे. वडिलांशी तसं तिचं पटायचं. कारण ती थोडीफार त्यांच्या धाकात होती, पण आता त्यांच्याशी पण तिचे खटके उडायला लागले होते.

आदल्यादिवशीचा प्रसंग सांगताना अपूर्वाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं. ती दोघंही अपूर्वाला समुपदेशनाला घेऊन आली होती. अपूर्वा अर्थातच शांत बसली होती, पण तिच्या देहबोलीतून तिच्या आत चालू असणाऱ्या खळबळीची कल्पना आलेली होतीच. तिच्या आईने सांगायला सुरुवात केली. तशी ती अजूनच अस्वस्थ होत होती. झालं असं होतं की, अपूर्वाची दहावीची शाळेची पहिली परीक्षा सुरू झाली होती. तिचा अभ्यासही झाला होता. शाळेत जाण्याआधी ती हलका नाश्ता करून शाळेत जात असे. त्या दिवशी तिच्या आईने तिला स्वतला बरं वाटत नव्हतं म्हणून सुट्टी घेतली होती. त्यामुळे तिने नाश्ता बनवला नव्हता. तिने अपूर्वाला दोन केळी खाऊन जायला सांगितलं तशी अपूर्वा एकदम चिडली. आईला वाटेल तसं बोलायला लागली जे आईच्या ऐकण्यापलीकडे होतं. “ती मला स्वार्थी, आळशी बाई म्हणाली. तुला कायम आरामच करायचा असतो. तू चांगली आई नाहीस. असं ऐकल्यावर मला रडायला आलं. मी नक्की काय चूक केली होती? पण ही ऐकण्यापलीकडे होती. यांना पण तिने जुमानलं नाही. त्यांनाही बायकोच्या ताटाखालचं मांजर असं म्हणाली.” आईने रडतच तो कटू प्रसंग सांगितला. “मग तुम्ही काय केलंत?” या प्रश्नावर अपूर्वाचे वडील म्हणाले, “शाळेत पेपरला जात होती. काय बोलणार? मी तर हे सगळं पहिल्यांदा तिच्या तोंडातून ऐकत होतो. आम्ही गप्प बसलो.” “मग? अपूर्वा… तू काय केलंस?” या प्रश्नावर अपूर्वा थोडी गडबडली, पण स्वतला सावरून घेत पटकन म्हणाली, “शाळेत तशीच गेले. दिवसभर जेवले नाही. रात्री हे दोघे जशी माझी माफी मागायला आले तेव्हाच मी खाल्लं.” तिच्या शेवटच्या शब्दांवर जोर जाणवला. अपूर्वाचे आई-वडील हतबल होऊन हे ऐकत होते. “ही अशी अचानक का वागायला लागली आहे हे आम्हाला कळतच नाहीये. अपूर्वा खरे तर समजूतदार आहे, पण ही अशी का वागतेय?” हे बोलताना तिच्या वडिलांचा आवाज घोगरा झाला.

“मॅम, मला तुमच्याशी एकटीने बोलायचं आहे. या दोघांना बाहेर पाठवाल का?” अपूर्वाने असं म्हणताच ती दोघंही केबिनबाहेर बसली. ती दोघंही बाहेर गेल्याची खात्री करताच तिने तिच्या वागण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. ते ऐकून तिच्याबद्दलचा दृष्टिकोनच बदलला गेला.

वास्तविक पाहता अपूर्वाला आजोबा (वडिलांचे वडील) होते जे तिच्या कुटुंबासोबत राहत होते. मात्र त्यांचं आणि अपूर्वाच्या आईचं कधीही पटलं नाही. जोपर्यंत तिची आजी होती, तोपर्यंत हे कुटुंब एकत्र होतं. मात्र आजी गेल्यावर अपूर्वाच्या कुटुंबात मालमत्तेच्या वाटणीवरून भांडणं झाली आणि त्यातच तिच्या आजोबांना तिच्या आईकडून बाहेर पडायला सांगण्यात आलं. तिच्या आजोबांचा आपल्या नातीवर विशेष जीव होता. त्यांनी कितीतरी गोष्टी तिला शिकवल्या होत्या. मात्र आजोबांना जेव्हा घर सोडून दुसरीकडे राहायला जावं लागलं तेव्हा तिच्यावर एक प्रकारचा आघात झाला आणि त्यामुळे ती चवताळली. ‘माझी आई वाईट आहे’ हे तिच्या मनाने घेतलं. त्यात भर म्हणजे आजोबांकडे ती मध्ये मध्ये जात होती. त्या वेळी तिच्या आजोबांकडूनही “मला पैशांसाठी तुझ्या आईने घराबाहेर काढलं” ही आजोबांकडून वारंवार पार ऐकून ती अधिकाधिक तिच्या आई-वडिलांबाबतीत कठोर बनली. “मी यांना धडा शिकवणार” या ईर्षेपोटी तिने त्या दोघांना, विशेषत आईला त्रास द्यायला सुरुवात केली.

मोठय़ांच्या आपापसांतील वादविवादांमध्ये जेव्हा लहान मुलांना ओढलं जातं तेव्हा मुलं ही काही वेळा चिथवली जातात आणि त्या वादाची पार्श्वभूमी लक्षात न घेता स्वतच प्रश्न सोडवायला जातात. अपूर्वानेही तिच्या पद्धतीने प्रश्न सोडवायला सुरुवात केली होती, पण त्याचे होणारे परिणाम तिच्या लक्षात येत नव्हते. पराकोटीचा राग, अस्वस्थपणा, हतबलता, अभ्यासाचा ताण आणि तिची पौगंडावस्था या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम अपूर्वावर होऊन ती बहुतेकवेळा हट्टाला पेटायची. राग बऱ्याचदा स्वतवर काढायची. कारण आई-वडिलांना अपराधी वाटेल असं काहीतरी करण्याचं तिचं उद्दिष्ट होतं, जेणेकरून त्यांना तिच्या आजोबांची व्यथा समजेल.

पालकांना अपूर्वाच्या वागण्यामागचं कारण समजल्यावर ती दोघंही प्रचंड ताणात गेली. नंतर दोघंही सावरली. त्यांना काही गोष्टी समजावण्यात आल्या जशा की कौटुंबिक मतभेद, वाद, एकमेकांबद्दल गैरसमज बोलताना घरातील लहान मुलांना त्यात घेऊ नये, अन्यथा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसंच जर मतभेद (सासरे आणि आई) जर बोलण्यातून दूर होत असतील तर तसे प्रयत्न करून बघावेत. कारण नात्यांमध्ये अहंकार नसावा. नाहीतर नाती उद्ध्वस्त होतात आणि त्या गमावण्याचा अपराधगंड मनस्ताप देऊ शकतो.

समुपदेशन सत्रांत समजावल्याप्रमाणे त्या दोघांना त्यांच्या चुका समजून आल्या. अपूर्वाबरोबरसुद्धा सत्रे सुरू झाली ज्यामध्ये तिला तिच्या समोरचे प्रश्न जे तिच्यासाठी महत्त्वाचे होते (करीअर, अभ्यास, तिचं व्यक्तिमत्त्व) त्याकडे तिने जास्त लक्ष द्यावे याबाबत समजावलं गेलं.  अपूर्वा हळूहळू या गोष्टी समजतेय आणि त्याप्रमाणे स्वतला सावरतेय. अभ्यासात लक्ष देतेय आणि चिडचिड कमी करतेय. तिच्या आई-वडिलांनी समुपदेशनाच्या माध्यमातून आजोबांनी बोलण्याचा प्रयत्न करून त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर केली आहे. त्यामुळेच आता नाती सुधारत आहेत.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)