
>> अभय मिरजकर
शेतीच्या कारणावरून अनेक घटना राज्यात घडतात. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होते, प्रसंगी जीवही गमवावा लागतो. हे गुन्हे घडूच नयेत यासाठी लातूर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सध्या लातूर जिल्ह्यात ’पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमधील भांडणे, वाद समोपचाराने लगेच मिटवले जात आहेत.
राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हा घडल्यानंतर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होत असतेच, परंतु गुन्हा घडणार नाही याची काळजी अगोदरच घेतली तर गुन्हे कमी होऊन समाजात शांतता प्रस्थापित राहील यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
16 मार्चपासून लातूर जिल्ह्यात हा उपाम राबवला जात असून तो 30 मेपर्यंत निरंतर चालणार आहे. त्यानंतर याचा लेखाजोखा मांडला जाईल. उन्हाळय़ाच्या या दिवसांमध्ये शेतीमध्ये नांगरणी, शेतीची भाजणी किंवा अन्य शेतीची कामे शेतकरी करत असतात. या वेळीच अधिक वाद, भांडणे होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कालावधीत लातूर जिह्यातील 1008 गावांमध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
लातूर जिल्ह्यात पोलीस दलाकडे तब्बल 181 शेतीसंदर्भातील विविध पारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने शेतरस्ता, अपामण, वाट अडवणे, रस्ता बंद करणे अशा पारींचा समावेश होता. वर्षानुवर्षे काही शेतकरी या पारींमध्ये भरडले जात होते. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या समजून घेऊन त्याचे निराकरण करत दोन्ही पक्षांना मनातून हातमिळवणी करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. या मोहिमेचे फलित म्हणजे आजपर्यंत पोलिसांकडे दाखल केलेल्या 181 पारी पैकी तब्बल 178 पारी समोपचाराने मिटवण्यात पोलीस दलास यश आले आहे.
लातूर जिल्ह्यातील सुमारे 300 गावांमध्ये या मोहिमेंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत. दररोज सकाळी दोन तास पोलीस ठाण्याचे प्रभारी किंवा दुय्यम अधिकारी नियमितपणे हे काम करीत आहेत. यामुळे भविष्यात उत्पन्न होणाऱया गुन्ह्यांवर, कलहावर प्रतिबंध घालणे शक्य होत आहे. समाजात शांतता आणि एकोपा कायम राहण्यास मदत होत आहे. ज्या ठिकाणची पार आहे त्या प्रत्यक्ष घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल होत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सामंज्यस्याने त्या पारीचा निपटारा केला जात आहे.


























































