परीक्षण – वास्तवाला थेट भिडणाऱ्या कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

मराठी कथालेखनाच्य्या प्रांगणात छाया महाजन हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण आणि आशय-विषयांच्या वेगळेणामुळे रसिकांना परिचित आहे. मानवी प्रवृत्ती त्यांना किती तीव्रपणे भावतात याचं सर्वांगीण चित्रण त्यांच्या आजवरच्या अनेक कथांमधून दिसत आलं आहे. ‘छाया महाजन-निवडक कथा’ हा नवा कथासंग्रही त्याला अपवाद नाही. स्वार्थ, लालसा, उद्धटपणा, कामवासना, द्वेष, क्रूरता यासारख्या माणसांच्या वागणुकीतून कळणाऱ्या वृत्ती त्यांना व्यथित करतात, वेदना देतात आणि त्यातूनच त्यांची कथा फुलते. स्त्री म्हणून स्त्रियांच्या भावना त्यांना जशा उत्कटपणे जाणवतात तशाच पुरुषांच्या मानसिकतेचा वेधही त्या तितक्याच आत्मीयतेने घेतात.

कथेतील कोणतेही पात्र साकारताना ते केवळ एकटं दुकटं न येता त्यासाठी त्याचं कुटुंब, समाज, संस्कृती याची पार्श्वभूमी घेऊन आल्यामुळे प्रभावी होतं याची जाणीव असल्यामुळे त्या पात्राला आणि कथेला नकळत अधिक ‘डेप्थ’ येते. समाज हा लेखिकेच्या आपुलकीचा आणि कुतुहलाचा विषय आहे. जाती-धर्मात गुंतलेल्या आणि पारंपरिक रूढीत बद्ध असलेल्या ग्रामीण भागात स्त्री-स्वातंत्र्याची कशी परवड होते याचं विदारक चित्रण त्यांच्या अनेक कथांमधून येतं. माणसानं, माणसाला माणसासारखं वागवलं तर तो पुष्कळ समाधानाने जगू शकेल ही लेखिकेची धारणा आणि अशा माणूसपणाचा आग्रह त्यांच्या कथांमधून दिसतो तो या विषयावर त्यांची निश्चित भूमिका असल्यामुळेच.

छाया महाजन यांच्या सात कथासंग्रहातील 85 पेक्षा अधिक कथांमधून विविध आशयसूत्रे असणाऱ्या 22 कथा या संग्रहात आहेत. कथाविषयांची कमालीची विविधता असणाऱ्या या संग्रहात मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय माणसं तसंच मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने, त्यांच्यावर बेतलेलं कथाविश्व आणि त्यांच्या जगण्याच्या धडपडीचं चित्रण आढळतं. कथेतील पात्र ठसठशीतपणे उभं करण्याची त्यांची लकब वैशिष्टय़पूर्ण असते. लहान मुलं, कुमारवयातील मुलं, तरुण, प्रौढ, अशिक्षित, सुशिक्षित अशा व्यक्तिरेखा त्यांच्या कथांमध्ये आहेत. माणसाची लैंगिकता हा त्यांच्या कुतूहलाचा आणि शोधाचा विषय आहे. वैवाहिक नाती, विवाहबाह्य नाती, घटस्फोट अशा स्त्री-पुरुष नात्यातील विविध तऱहा त्यात आहेत. पात्रांचं मनोविश्लेषण, त्यांचे आंतरिक ताण कथांमधून प्रभावीपणे व्यक्त होतात. त्यांच्या कथांमध्ये कामगार वर्गातील हातावर पोट असलेल्या गरीब माणसांपासून उच्चपदस्थ, अतिश्रीमंतापर्यंतची माणसेही आढळतात. असहाय्य वृद्ध, अपंग, असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली, शरीरात व्यंग असल्यामुळे जगण्याचा साधा सरळ मार्ग नाकारली गेलेली पात्रंही आहेत. पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या माणसापासून शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता यांची मनंही इथे बोलकी होतात. स्त्रियांचं अनुभवविश्व आता पूर्वीसारखं मर्यादित राहिलं नसून ते तितक्याच उत्कटपणे मांडणारी धीट शैलीही महाजन यांच्या या संग्रहात दिसते. मन, भावना आणि शरीर यांची सर्वाधिक गुंतवणूक असलेले स्त्री-पुरुष संबंध व्यामिश्र असल्यामुळे त्यांचा वेध घेणं आव्हानात्मक असलं तरी हे आव्हान लेखिकेने लीलया पेललं आहे. विवाहबंधनातील शोषणव्यवस्था अधोरेखित करताना ही नाती किती तकलादू असतात याचं वास्तव या कथांमधून स्पष्ट होत जातं. कुटुंबाशी बांधली गेलेली स्त्री, त्या नात्यात येणारा दुरावा, त्या परिस्थितीतून येणारी बेचैनी, अस्वस्थता, स्त्रीच्या जगण्याची विविध कारणांमुळे होणारी फरफट, लेखिका परिणामकारकपणे मांडते. दारू पिणारा नवरा आणि सासरा, पत्नीला मारझोड करणारा नवरा, स्वत:च्या बढतीसाठी पत्नीला बासकडे पाठवणारा नवरा, विधवा सुनेवर अत्याचार करणारे सासरे, संशोधक विद्यार्थिनीचा गैरफायदा घेणारा प्राध्यापक अशी समाजात वावरणारी काही काळय़ा छायेची माणसं या कथांमधून दिसतात.

काही कथा व्यक्तिचित्रणात्मक आहेत. काही तरल, भावस्पर्शी आहेत. मात्र कथेतील कोणताही शारीर अनुभव व्यक्त करताना त्या त्यांना हवी तशीच भाषा आणि शैली वापरतात. स्त्री-पुरुष असा अपवाद त्यात नसतो किंवा सोवळे-ओवळेपणाही नसतो. जगण्याच्या संघर्षमय परिस्थितीतील विषयांचं वैविध्य तर थक्क करणारं आहे. क्वचित एखाद्या कथेत रेखीव निसर्गचित्रण येतं. बाकी कथा थेट आशयाला भिडतात. कुठेही त्यात अलंकृतपणा येत नाही की पसरट वर्णनं येत नाहीत. साधी-सरळ, थेट नेहमीच्या व्यवहारातील भाषा असते. या लेखिकेला जीवनाची एक उपेक्षित बाजूच का दिसते, असा प्रश्न त्यांच्या कथा वाचल्यानंतर अनेकांना पडणं स्वाभाविक आहे. परंतु समाजातील उपेक्षितांच्या क्यथा, दु:ख, अन्याय पाहण्याचे जळजळीत अनुभव गाठीशी असले की त्यांच्या मुळाशी जाण्याची असोशी हीच या लेखिकेची जीवनदृष्टी आहे, हे प्रत्ययास येतं. म्हणूनच या कथा जिवंत आणि रसरशीत वाटतात. वाङ्मयमूल्यापेक्षा जीवनमूल्ये महत्त्वाची मानली की अवती भवती दृष्टीस पडणाऱ्या जगण्याच्या विसंगती जाणवू लागतात आणि त्या तितक्याच सहजपणे लेखनातून व्यक्तही होतात. छाया महाजन यांच्या कथा तशाच असल्यामुळे त्या अधिक भावतात.

छाया महाजन : निवडक कथा
लेखिका : छाया महाजन
प्रकाशक : लोकवाङ्मयगृह
पृष्ठे : 247,
मूल्य : रुपये 400/-