
इराण युद्धादरम्यान पाकिस्तानात झालेल्या शांतता चर्चेने जगाचे लक्ष्य वेधले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दूर करत पाकिस्तानला जवळ केले असून गेल्या काही दशकांमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिकेत निर्माण झालेली द्विपक्षीय मैत्री कमकुवत झाल्याचे मत अमेरिकेचे माजी राजदूत रहम इमॅन्युएल यांनी व्यक्त केले.
इमॅन्युएल यांनी हिंदुस्थान-अमेरिका संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत इमॅन्युएल म्हणाले की, हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी चार सलग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बरेच केले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाने या प्रयत्नांना धक्का देत हिंदुस्थानकडे दुर्लक्ष केले आणि पाकिस्तानकडे झुकलेली भूमिका घेतली. ही भूमिका अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे जुने व पारंपरिक मित्र नाराज झाले आहेत. हिंदुस्थान, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या महत्त्वाच्या सहयोगी देशांशी असलेले संबंध ताणले गेले असून, या देशांमध्ये अमेरिकेबद्दलचा विश्वास कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. मित्रदेशांवर टॅरिफ लादणे, त्यांना धमक्या देणे आणि सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान करणे ही धोरणे चुकीची आहेत, असे इमॅन्युएल म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची वक्तव्ये हिंदुस्थानच्या भूमिकेच्या विरोधात असल्याची टीका इमॅन्युएल यांनी केली.



























































