
>> सुधीर थोरवे
आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. या दिनानिमित्ताने दरवर्षी अग्नी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कारखाना, अग्निशमन पेंद्रे तसेच हल्ली सामाजिक क्षेत्रातदेखील अग्नी सुरक्षेविषयी मोठय़ा प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना दिसत आहे. अग्नी सुरक्षा दिनाची या वेळेची थीम ‘सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालये आणि अग्नी सजग समाज, अग्नी सुरक्षेसाठी एकत्र येऊ या’ समाजातील सर्वात संवेदनशील घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि एकत्रित जबाबदारीची जाणीव करून देते. भारतामध्ये दरवर्षी हजारो आग लागण्याच्या घटना घडतात आणि हजारो लोक आपला जीव गमावतात. मुंबईसारख्या महानगरात दरवर्षी 5000 पेक्षा अधिक आग घटना नोंदवल्या जातात, परंतु या घटना संख्या नसून त्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळते. भारतामध्ये मागील एक वर्षात सुमारे आठ हजारांच्या वर मध्यम व मोठय़ा आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या, त्यामध्ये सात हजारांच्या वर लोक आगीमुळे मृत्युमुखी पडले.
छोटी शहरे मोठी होऊ लागली व मोठी शहरे अधिक व्यापक होऊ लागलेली आहेत. उंच उंच इमारती व त्यामधील आगींसारख्या दुर्घटना घडल्यास त्या नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणेपुढे मोठे आव्हान असते. निवासी विभागातील आगींच्या दुर्घटनांमध्ये प्रामुख्याने घरातील वाढणारा लायटिंगचा भार, जुन्या वायरिंग व त्यामुळे होणारे शॉर्ट सर्किट तसेच स्वयंपाकघरातील गॅस गळती यांचे प्रमाण मोठे असते. सर्किट ब्रेकर आहेत, परंतु ते कार्यरत आहेत का? याबद्दल अज्ञानच जास्त पाहायला मिळते. घरगुती गॅसचा वापर व त्याची सुरक्षा याविषयी सगळ्यांना माहिती असते, परंतु या घटना निष्काळजीपणामुळेच घडतात. तसेच एकाच्या चुकीचा त्रास हा आजूबाजूच्या लोकांना सोसावा लागतो. बऱ्याच सोसायटय़ांमध्ये अग्नी यंत्रणा लावलेली असते, परंतु त्याला खर्चाच्या दृष्टीने दुय्यम स्थान दिल्यामुळे त्याची देखभाल होत नाही व आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या कार्यान्वित नसल्याचीच शक्यता जास्त असते.
अनिवासी भागात परवान्याच्या सक्तीमुळे अग्निशमन यंत्रणा बसवली जाते, परंतु वापराच्या वेळी देखभालीअभावी बऱ्याचदा ती कार्यरत नसल्याचे दिसून येते.
अग्निशमन व्यवस्थापनाकडून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कडक धोरण तसेच लोकांमधील वाढत असलेली जागरूकता यामुळे मागील काही वर्षांत आगीच्या प्रमाणात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे असे असले तरी ही आकडेवारी नक्कीच सुखद नाही. आगींपासून होणारे नुकसान कमी करायचे झाल्यास सर्वप्रथम आग लागू नये यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक सोसायटीने तसेच विविध आस्थापनांनी फायर सेफ्टी ऑडिट आणि एनर्जी ऑडिट करून त्यामधील त्रुटी वेळोवेळी दूर करणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे इमारतीच्या स्ट्रक्चरनुसार अग्नी सुरक्षा यंत्रणेची पूर्तता व ती कार्यरत राहण्याची खबरदारी तसेच ही यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधितांना मिळणे आवश्यक आहे.

























































