इंदूरमधील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोट; चार कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तरपुरा येथील रामकी एन्वायरो कंपनीमध्ये मंगळवारी एक भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्फोट इतका शक्तीशाली होता की त्याचा धक्का आजूबाजूच्या परिसरातील इमारतींनाही जाणवला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र पोलीस आणि संबंधित विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.