
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बेकायदा एलइडी मासेमारी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेअंतर्गत देवगडचे परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास समुद्रात गस्त घातली. रात्री एक वाजताच्या सुमारास किनाऱ्यापासून नऊ समुद्री मैल अंतरावर ‘अमीना’ नावाची नौका संशयास्पदरीत्या मासेमारी करताना आढळली. पथकाने जवळ जाऊन पाहणी केली असता, या नौकेवर नियमांचे उल्लंघन करून घातक अशा एलडी लाइट्सचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले.
सुमारे २० वाव खोल पाण्यात सुरू असलेली ही अवैध मासेमारी तातडीने थांबवून अधिकाऱ्यांनी ती नौका आपल्या ताब्यात घेतली. या मोहिमेत सुरक्षा रक्षक बांधकर, खवले, टुकरुल, फाटक, नेसवनकर आणि सावजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक तपासात या नौकेचे मालक आणि चालक देवगडचेच असल्याचे समोर आले असून आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.
























































