निष्काळजीपणाचा बळी! नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्नात बाळ दगावले, आई थोडक्यात बचावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. आशा वर्कर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा निष्पाप बळी गेला. बळजबरीने नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रयत्नात नवजात बाळाचे शीर धडापासून वेगळे झाले. सुदैवाने आई थोडक्यात बचावली आहे. यानंतर प्रकरण दडपण्यासाठी स्टाफ नर्सने महिलेला एका खासगी रुग्णालयात पाठवले.

महिलेची प्रकृती अधिकच बिघडत असल्याने खासगी रुग्णालयाने तिला बस्ती येथील महर्षी वशिष्ठ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. येथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भाशयातून बाळाचे शीर बाहेर काढले.

मुरादपूर गावची रहिवासी असलेली प्रेमा देवी सात महिन्यांची गर्भवती होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला सरकारी रुग्णवाहिकेतून सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात येत होते. महिलेला जोरात कळा येत असल्याने आशा वर्करने रुग्णवाहिकेतच वेदनाशामक औषध देऊन जबरदस्तीने सामान्य प्रसुती करण्याचा प्रयत्न केला. यात बाळाचे डोके महिलेच्या गर्भाशयातच राहिले आणि धड बाहेर आले. सुदैवाने महिला सुखरुप बचावली आहे.

याप्रकरणी पीडितेच्या सासरच्यांच्या फिर्यादीवरून कलवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.