
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 वर्षांच्या इतिहासात जे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मिचेल स्टार्क सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते नवखा खेळाडू प्रफुल हिंगे याने करून दाखवलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात प्रफुलने पहिल्याच षटकात 3 फलंदाजांना बाद करत नवा इतिहास रचला. आपल्या स्पेलमध्ये एकूण 4 विकेट्स घेत त्याने हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, ज्यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रफुलच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे तो रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. सामन्यापूर्वी प्रफुलच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केवळ 1 हजारच्या आसपास फॉलोअर्स होते. मात्र, सोमवारी (13 एप्रिल 2026) त्याने मैदानात केलेल्या कामगिरीनंतर अवघ्या 24 तासांत त्याच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांच्या वर पोहोचली आहे. समालोचक नवजोत सिंह सिद्धू यांनीही त्याच्या या वाढत्या लोकप्रियतेची दखल घेत ही माहिती चाहत्यांना दिली.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 216 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार ईशान किशनने 91 धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 159 धावांवर गारद झाला. हैदराबादकडून प्रफुल हिंगे आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी 4 बळी घेत राजस्थानचे कंबरडे मोडले आणि आपल्या संघाला 57 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

























































