
कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात ९ कोटी ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात अशा फुकट्या प्रवाशांकडून २७ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या विविध ट्रेनमधून अवैधरित्या आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षभरात चालवलेल्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होत असतो. त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात कोकण रेल्वेने ठोस पाऊले उचलली आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात विना तिकीट प्रवास करणाऱ्या २१ हजार ५२७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तर अवैध तिकिटासह रेल्वेत चढलेल्या १० हजार ७४१ प्रवाशांवर कारवाई करत कोकोण रेल्वेने या आर्थिक वर्षात ९ कोटी ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षी याच विभागातून ७ कोटी ७४ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता.
कोकण रेल्वेने अशा प्रवाशांना पकडण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली असून हे पथक मार्गावर विविध ठिकाणी तिकीट तपासणीचे काम करत आहे. या पथकाने गेल्या वर्षभरात विविध गाड्यांमध्ये तपासणी करत २ हजार २०४ अवैध आणि विनातिकीट म्हणून कारवाई केली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांनी नियमित तिकीट काढून प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी केले आहे.
























































