
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील तौंसा शहरातून मानवी सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका मोठ्या सरकारी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 331निष्पाप बालकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या सुयांचा पुन्हा वापर केल्यामुळे या चिमुकल्यांचे आयुष्य धोक्यात आले असून, या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तौंसा शहरात गेल्या काही काळापासून मुलांमध्ये एचआयव्हीची लक्षणे वेगाने वाढत होती. नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या वर्षभराच्या कालावधीत तपासणी केली असता, 331 बालकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. या धक्कादायक आकडेवारीनंतर बीबीसीच्या एका पथकाने या रुग्णालयात जाऊन गुप्तपणे पाहणी केली असता, तिथले वास्तव पाहून सर्वांनाच धक्का बसला. रुग्णालयातील कर्मचारी एकाच सिरिंजचा वापर करून अनेक मुलांना इंजेक्शन देत असल्याचे या तपासात उघड झाले. सरकारी रुग्णालयातील या गंभीर प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे आणि कर्मचारी आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2019 मध्ये सिंध प्रांतातील रातोडेरो येथेही अशाच निष्काळजीपणामुळे शेकडो मुलांना एचआयव्हीची लागण झाली होती आणि 2021 पर्यंत ही संख्या 1500 वर पोहोचली होती. जर प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली असती आणि सुयांच्या पुनर्वापरावर बंदी घातली असती, तर या चिमुकल्यांना या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला नसता, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात संताप व्यक्त होत असून पीडित कुटुंबांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.























































