
मराठी सिनेसृष्टीचा ‘हँडसम हंक’ आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता भूषण प्रधान सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. आपल्या फिटनेस आणि दमदार अभिनयाने ओळखल्या जाणाऱ्या भूषणने नुकतीच सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे त्याच्या हजारो फिमेल फॅन्सचे हृदय तुटले आहे. भूषणने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे तो फोटो पाहून त्याने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भूषणने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो एका मुलीला मिठी मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही तरुणी पाठमोरी उभी असल्याने तिची ओळख अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र भूषणचा आनंदी चेहरा फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळतोय. या दोघांनीही एकमेकांच्या हातावर हात ठेवला असून त्यांच्या बोटांमध्ये अंगठ्या चमकताना दिसत आहेत. या फोटोवर “24 जुलै 2026 ही तारीख लक्षात ठेवा आणि आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा…” असा मजकूर लिहिलेला आहे. भूषणने कॅप्शनमध्येही हीच तारीख नमूद केल्यामुळे त्याने आपला साखरपुडा उरकून नव्या आयुष्याची सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू झाला असून अनेक मराठी कलाकारांनी भूषणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, भूषणची होणारी पत्नी नेमकी कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, या पोस्टबाबत काही तर्कवितर्कही लढवले जात आहेत. 24 जुलै 2026 रोजी शुक्रवार येत असल्याने, भूषणचा एखादा नवा चित्रपट त्या दिवशी प्रदर्शित होत असावा आणि हे केवळ त्या सिनेमाचे प्रमोशन असावे, असा अंदाजही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता हा खरोखरच भूषणचा साखरपुडा आहे की त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
























































