ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर; श्रीलंकेचा दिलशान मदुशंका सनरायझर्स हैदराबाद संघात सामील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे IPL 2026 मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सनरायझर्स हैदराबादने श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याची संघात निवड केली आहे. सनरायझर्सने कार्सला 1 कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र स्पर्धेपूर्वीच झालेल्या दुखापतीमुळे तो पहिल्या पाच सामन्यांना मुकला होता. अखेर आज (14 एप्रिल 2026) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मदुशंकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

ब्रायडन कार्सच्या दुखापतीबाबत माहिती देताना मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी सांगितले होते की, सराव सत्रात फलंदाजी करत असताना कार्सच्या गोलंदाजी करणाऱ्या हाताला चेंडू लागला होता. सुरुवातीला हाड मोडले नसल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र हाताला प्रचंड सूज आल्यामुळे त्याला चेंडू पकडणे कठीण जात होते. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आशा फ्रँचायझीला होती, परंतु प्रकृतीत पुरेशी सुधारणा न झाल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

नवा खेळाडू दिलशान मदुशंका याला सनरायझर्सने 75 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. मदुशंकासाठी आयपीएल नवीन नाही, कारण यापूर्वी तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदुशंकाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 28 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले असून, त्याच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय विकेटची नोंद आहे.