
संयुक्त अरब अमिरातीने (युएई) नुकतेच पाकिस्तानकडे आपल्या पैशांची मागणी केली आहे. पाकिस्तानला या महिन्यात सौदी अरेबियाला ३.५ अब्ज डॉलर्स परत करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने हे पैसे परत केले, तर काही दिवसांतच त्याचा परकीय चलन साठा कोसळेल. हे टाळण्यासाठी, पाकिस्तान सौदी अरेबिया आणि चीनकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीन आणि सौदीकडे हात पसरले आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करताना, जगभरात स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. पण आता, हाच पाकिस्तान निधीसाठी इतर देशांसमोर हात पसरत आहे. युएईने पाकिस्तानकडून ३.५ अब्ज डॉलर्स तात्काळ परत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर दबाव येत आहे. हे संकट टाळण्यासाठी पाकिस्तान सौदी अरेबिया आणि चीनसोबत कर्ज आणि गुंतवणूक या दोन्हींसाठी हात पसरत आहे.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) कर्ज फेडण्याची तयारी करत असतानाच सौदी अरेबिया आणि चीनकडून कर्जासाठी वाटाघाटी करत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनुसार, या चर्चांमध्ये कर्ज आणि गुंतवणूक या दोन्ही बाबींचा समावेश आहे.
यूएईकडून मिळालेले ३ अब्ज डॉलर्स २०१८ पासून पाकिस्तानची मध्यवर्ती बँक, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा आहेत आणि त्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. सात वर्षांत प्रथमच पाकिस्तान यूएईसोबत कर्ज नूतनीकरण करारावर पोहोचण्यात अयशस्वी ठरला आहे. ३ अब्ज डॉलर्स व्यतिरिक्त, पाकिस्तानवर संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) आणखी ४५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज अनेक वर्षांपासून आहे.
संयुक्त अरब अमिराती दोन्ही कर्जांच्या परतफेडीची मागणी करत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना अंदाजे ३.५ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. पाकिस्तान या कर्जाची परतफेड करत आहे, मात्र त्यानंतर त्यांच्या परकीय चलन साठ्यावर दबाव वाढेल. सध्या, पाकिस्तानकडे अंदाजे १६ अब्ज डॉलर्सचा साठा आहे, जो केवळ तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील आर्थिक आणि सुरक्षा संबंध मजबूत झाले असले तरी, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील संबंध काही प्रमाणात बिघडले आहेत. संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानकडून तात्काळ निधीची केलेली मागणी, वाढत्या पाकिस्तान-सौदी संबंधांमुळे ते नाराज असल्याचे सूचित करते.
सौदी अरेबियाने अलीकडेच म्हटले आहे की, पाकिस्तानने परस्पर संरक्षण कराराअंतर्गत आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी लढाऊ विमाने पाठवली आहेत. आखाती देशातील अमेरिकेसोबतच्या संघर्षादरम्यान इराणने सौदी अरेबिया आणि इतर शेजारी देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीनेही पाकिस्तानकडून तात्काळ निधीची मागणी का करत आहे, हे स्पष्ट केलेले नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला ‘नियमित आर्थिक व्यवहार’ म्हटले असून दोन्ही देशांमधील कोणताही तणाव नसल्याचे स्पष्ट केले आहे.


























































