
माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोटच्या पित्यानेच आपल्या सहा वर्षीय चिमुरड्याची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. चारित्र्याच्या संशयातून आणि मुलाच्या पितृत्वावर घेतलेल्या शंकेतून हा पोटचा गोळा संपवण्यात आला. विशेष म्हणजे, ही भीषण घटना आरोपीने तब्बल 20 दिवस लपवून ठेवली होती, मात्र पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे या गूढ हत्येचा पर्दाफाश झाला आहे.
या थराराची सुरुवात 18 मार्च रोजी झाली, जेव्हा कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर परिसरात कृष्णा नदीच्या काठावर एका अज्ञात बालकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कोणताच सुगावा हाती लागत नसल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले होते. मात्र, तांत्रिक तपास आणि कर्नाटक पोलिसांशी साधलेल्या समन्वयानंतर हा मृतदेह कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील नागठाणे गावातील 6 वर्षीय सिद्धार्थ मल्लिकार्जुन अरेकारी याचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता संशयाची सुई मुलाच्या वडिलांकडे, मल्लिकार्जुन अरेकारीकडे वळली. तपासादरम्यान समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. 16 मार्च रोजी आरोपी मल्लिकार्जुनने मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा असल्याचे सांगून घरातून नेले होते. मात्र, त्याने मुलाला थेट कराड तालुक्यातील उमराज येथील शिवदे गावाजवळ कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिले. या क्रूर कृत्यापूर्वी त्याने मुलाला नवीन कपडे घातले होते आणि मुलाला नदीत ढकलल्यानंतर तो काहीच घडले नसल्याच्या अविर्भावात घरी परतला.
या हत्येमागील कारण संशय असल्याचे समोर आले आहे. आपला मुलगा आपल्यासारखा दिसत नाही, यावरून मित्र टोचून बोलायचे, ज्यातून मल्लिकार्जुनच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. याच रागातून त्याने 1 एप्रिल रोजी असलेल्या मुलाच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच त्याचे आयुष्य संपवले. मुलाच्या वाढदिवशी आईने वारंवार विचारणा करूनही मल्लिकार्जुन समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, त्यामुळे पत्नीने पोलिसांत धाव घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. सध्या आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून समाजात या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
























































