सामना अग्रलेख – युद्ध कोणाला हवे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामाबादमधील अमेरिकाइराण शांती चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी जगभराचा मीडिया आला. त्यांनी इस्लामाबादला नव्याने जागतिक नकाशावर नेले. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ जनरल मुनीर यांनी जागतिक नेत्यांबरोबर झोपाळ्यावर हिंदोळे घेतानाची छायाचित्रे प्रसिद्ध केली नाहीत. पाकिस्तानने या घडामोडींचा वापर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी करून घेतला. 21 तास चर्चेनंतरही यशस्वी फॉर्म्युला निघाला नाही, पण चर्चा झाली हे महत्त्वाचे. अमेरिकेला युद्धातून बाहेर पडायचे आहे. इस्रायलची जनता युद्धाला थकली आहे. इराणचे शासन जनता शेवटच्या श्वासापर्यंत मागे हटायला तयार नाही. हे तिघे इस्लामाबादेत एकत्र आले कोणत्याही निर्णयाशिवाय परत गेले. तरीही आशा सोडता कामा नये.

इस्लामाबाद टॉक’ फेल झाले यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करायची? पाकिस्तानात ते ‘टॉक’ फेल झाले म्हणून आनंद व्यक्त करायचा की पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटेल, त्यात निरपराध माणसे, लहान मुलेबाळे नाहक मारली जातील म्हणून दुःख व्यक्त करायचे? सैतानाच्या मध्यस्थीने का होईना, पण युद्ध थांबायला हवे असे जगातील बहुसंख्य राष्ट्रांना व जनतेला वाटत आहे. तीच भावना योग्य आहे. ‘टॉक’ फेल गेले याचा ज्यांना आनंद झाला ते माणुसकीचे शत्रू आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स हे इस्लामाबादेतून अमेरिकेस रवाना झाले. या वार्ता फेल गेल्या याचा सगळ्यात जास्त आनंद भारतातील भाजप पुढाऱ्यांना, मोदी व त्यांच्या अंधभक्तांना झाला असेल. कारण ‘इस्लामाबाद टॉक’मध्ये विश्वगुरूंचा साधा नामोल्लेखही कोणी केला नाही. विश्वगुरूंशिवाय जगरहाटी सुरू आहे, पण इस्लामाबादमध्ये काय होणार याकडे जग डोळे व कान लावून बसले होते. पहिल्या दिवशी काही विशेष घडले नाही म्हणून पुढील दहा दिवसांत सकारात्मक पावले पडणार नाहीत असे कसे म्हणता येईल? युद्ध कोणालाच नको आहे, पण युद्धखोरांना ते स्वतःच्याच अटी-शर्तींवर थांबवायचे आहे. युद्धबंदीतही प्रत्येक जण आपला फायदा पाहत आहे. स्पेन, इटलीसारख्या राष्ट्रांनी सर्वप्रथम ट्रम्प यांच्या युद्धखोरीला विरोध केला. फ्रान्सच्या अध्यक्षांनीही प्रे. ट्रम्प यांना सुनावले. पोपसाहेबही शांतीचा संदेश घेऊन उभे राहिले. प्रे. ट्रम्प यांना सत्ता आणि पैशांची मस्ती आलीच आहे. ट्रम्प हे एक व्यापारी आहेत. व्यापाऱ्याच्या हाती सत्ता गेली की, त्याला मानवी किंकाळ्यांचे काहीच वाटत नाही. पोप म्हणाले, ‘‘युद्ध संपले पाहिजे.’’ यावर ट्रम्प भडकून म्हणाले, ‘‘पोप यांनी या भानगडीत पडू नये. त्यांनी मर्यादेत राहावे. नाहीतर आम्ही त्यांच्या सर्व

विशेष सोयीसुविधा

बंद करू.’’ यावर पोप यांचे उत्तर संयमी आहे. ‘‘ट्रम्प यांना वाटते संपूर्ण जगाने त्यांच्या समोर गुडघे टेकावेत. त्यांचे पुतळे उभारावेत. ते होणार नाही. पैशांची पूजा कोणी का करावी? शक्तीचे आणि सत्तेचे प्रदर्शन आता खूप झाले. युद्ध थांबायला हवे.’’ पोप ख्रिश्चन आहेत. इराण व इस्रायल, दुबई, कुवेत, बहरीन, इराक वगैरे राष्ट्रे ख्रिश्चन नाहीत. ती मुसलमान, अरब किंवा ज्यू आहेत. तरी पोप यांनी शांतीचा संदेश देत युद्ध संपले पाहिजे असे सांगितले, पण ख्रिश्चन धर्मीय प्रे. ट्रम्प ते मानायला तयार नाहीत. हा एक प्रकारे मानसिक आजाराचा दहशतवाद आहे. निरपराध नागरिक मरताना व मारताना पाहण्याचा आनंद घेणारे नेतान्याहू, प्रे. ट्रम्प यांच्या सारखे लोक हे विकृतच म्हणावे लागतील. त्यामुळे इस्लामाबाद टॉक पहिल्या दिवशी असफल झाले त्याचे आश्चर्य वाटायला नको. अमेरिकेने या शांती वार्तेचे ठिकाण इस्लामाबाद निवडले. पंतप्रधान मोदी यांनी अकलेने काम घेतले असते तर हे ठिकाण कश्मीर, शिमला, मनाली, शिलाँग, महाबळेश्वर, दिल्ली, मुंबईच काय, राजकीय लाभांसाठी अहमदाबाद किंवा साबरमतीही झाले असते. विश्वगुरूंना मोठा डंका वाजवता आला असता, पण त्यांचे उथळ पाणीही या वेळेला खळखळले नाही. प्रे. ट्रम्प यांनी त्यांना युद्धप्रश्नी तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचे आदेश दिले व नेतान्याहूंकडे एपस्टीन फाईल्सचे भांडार असल्याने विश्वगुरू पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात दंग राहिले. खरे म्हणजे या ‘टॉक’च्या प्रसिद्धी होर्डिंग्ज, स्वागत बॅनरवर स्वतःचे फोटोही विश्वगुरूंना झळकवता आले असते, पण ती संधी त्यांना ट्रम्प यांनी दिली नाही. अर्थात अशा जागतिक घडामोडींची ‘मेहमान नवाजी’ कशी करावी याचे संयमी दर्शन पाकिस्तानने घडवले. जागतिक प्रतिनिधी मंडळाच्या स्वागताचे जे फलक लागले त्यात

कोणाचेच फोटो

नाहीत. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या आगाऊपणाचे फोटो नाहीत. इस्लामाबादेतील त्यांच्या पक्षातील पुढाऱ्यांचे फोटो नाहीत. त्यामुळे इस्लामाबाद टॉकला जागतिक घडामोडींचा रंग आपोआप चढला. ही चर्चा यशस्वी झाली नाही याचा अर्थ युद्धाला लगेच तोंड फुटेल असे नाही. अमेरिकेचा अहंकार इराणने उद्ध्वस्त केला व ती जखम भरून निघणे इतक्यात तरी कठीण आहे. इराण होर्मुझवरचे नियंत्रण सोडायला तयार नाही. युरेनियमचा साठा नष्ट करायला तयार नाही. इराणची जगभरातील संपत्ती अमेरिकेने मुक्त करावी ही इराणची मागणी आहे. अमेरिका त्यावर विचार नक्कीच करील. इराणच्या समुद्रमार्गातून जाणाऱ्या जहाजांकडून ‘टोल’ वसूल करण्याची भूमिका अमेरिकेला मान्य नाही. पुन्हा हल्ला होणार नाही यांची ‘गॅरंटी’ इराणला हवी आहे. या मुद्दय़ांवर आज चर्चा फिस्कटली असली तरी चर्चेचा पूल पूर्णपणे कोसळलेला नाही. या पुलावरची वर्दळ थांबली आहे इतकेच. इस्लामाबादमधील अमेरिका-इराण शांती चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी जगभराचा मीडिया आला. त्यांनी इस्लामाबादला नव्याने जागतिक नकाशावर नेले. पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ व जनरल मुनीर यांनी जागतिक नेत्यांबरोबर झोपाळ्यावर हिंदोळे घेतानाची छायाचित्रे प्रसिद्ध केली नाहीत. इस्लामाबादची लोकसंख्या जेमतेम 25 लाख, पण या घडामोडींसाठी तेथील सरकारने शहर पूर्ण बंद केले. हजारो सैनिक सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात केले. पाकिस्तानने या घडामोडींचा वापर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी करून घेतला. 21 तास चर्चेनंतरही यशस्वी फॉर्म्युला निघाला नाही, पण चर्चा झाली हे महत्त्वाचे. अमेरिकेला युद्धातून बाहेर पडायचे आहे. इस्रायलची जनता युद्धाला थकली आहे. इराणचे शासन व जनता शेवटच्या श्वासापर्यंत मागे हटायला तयार नाही. हे तिघे इस्लामाबादेत एकत्र आले व कोणत्याही निर्णयाशिवाय परत गेले. तरीही आशा सोडता कामा नये.