जायकवाडी धरणावरील डिजिटल भूकंपमापक यंत्र शासनाने केले रद्द!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बद्रिनाथ खंडागळे

जायकवाडी धरणावर बसवण्यात येणारे डिजिटल भूकंपमापक यंत्र राज्य शासनाने रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील भूकंपांच्या नोंदी तत्क्षणी नोंदविणारे अद्ययावत भूकंपमापक यंत्र कोयना प्रकल्पावर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. चीड आणणारी बाब म्हणजे जुने भूकंपमापक यंत्र १० वर्षांपासून निकामी झाले असल्याने पैठणच्या जलसंपदा प्रशासनाने यासाठी उपलब्ध निधीतून ४६ लाख रुपयांचा धनादेशही नाशिक येथील ‘मेरी’ या संशोधन संस्थेकडे सुपूर्द केला होता.

जायकवाडीसह राज्यातील लोअर, दुधना, पुणंद व गिरणा या ४ घरांवरसुद्धा नव्याने यंत्रे बसवण्यात येणार होती. जायकवाडी, नाशिक, कोयना, कोनलकट्टा, उजनी, गोसीखुर्द, पार्डी-वर्धा, इसापूर व अक्लवाडा या ९ धरणांवरील यंत्रे निकामी झाल्यामुळे डिजिटल भूकंपमापक यंत्रे कार्यान्वित होणार होती. नवीन डिजिटल भूकंपमापक यंत्रे खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली होती. या सर्व १३ प्रकल्पांवर यंत्रे न बसवण्याचा निर्णय आता जलसंपदा प्राधिकरणाने घेतला असून, तसा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे.

३१ वर्षापूर्वीचे भूकंपमापक यंत्र १० वर्षांपासून निकामी!

जायकवाडी प्रकल्पावर १५ नोव्हेंबर १९९४ रोजी अमेरीकन बनावटीचे भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले होते. तत्कालीन आमदार अनिल पटेल यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केल्यावर शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. हे यंत्र ‘एमइक्यू ८-८०० मायक्रो ऑर्थक्वेक’ या कंपनीचे आहे. सदर यंत्रावर देश-विदेशातील भूकंपांची अद्ययावतपणे नोंद होत असे. टाईपरायटरच्या आकराच्या या यंत्राची मुख्य वायर भूगर्भात तब्बल ८० मीटर खोलीपर्यंत टाकलेली आहे. २३ वर्षे कार्यान्वित असलेले हे यंत्र अनेक वेळा बंद पडू लागले होते. १० वर्षांपासून तर हे यंत्र निकामी झालेले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी नवीन यंत्रासाठी जलसंपदा मंत्रालय (मुंबई) कडे प्रस्ताव पाठवला होता.

संशोधकांनी केलेली पाहणी गेली वाया …

या पार्श्वभूमीवर नवीन यंत्रासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. ऑगस्ट २०१९ ला समितीने अहवाल सादर केला. ‘भूकंप वेधशाळा’ व नाशिक येथील ‘मेरी’ संशोधन केंद्राच्या संशोधकांनी यंत्र बसवण्याच्या नियोजित जागेची पाहणीसुध्दा केली होती. भौगोलिक व खडकस्तरीय भूभाग आणि भू-कंपनाची क्षमता तपासण्यात आली. होकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. नंतर निधीही उपलब्ध झाला. जायकवाडी (उत्तर) कर्मचारी वसाहत परिसरातील ‘जलबिजली विश्रामगृह’ येथे २०२२ साली हे भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या यंत्राची खरेदी करण्याचे अधिकार नाशिक येथील मेरी संशोधन केंद्राकडे असल्याने ८ मे २०२३ रोजी ४५ लाख ९२ हजार ५१ रुपयांचा धनादेश (क्रमांक ०२४४४३) संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला होता; परंतु आता हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने रद्दबातल ठरवला आहे.

जगभरातील भूकंपांच्या ‘जायकवाडी ‘त होणार होत्या नोंदी!

नवीन भूकंपमापक यंत्र हे जगभरातील भूकंपांच्या नोंदी ठेवण्याएवढे सक्षम आहे. अहोरात्र हे यंत्र कार्यान्वित असते. हे यंत्र भूकंपाची पूर्वसूचना देत नाही. किंवा भूकंप झाल्यावरच्या उपाययोजनेसाठीसुद्धा यंत्राचा उपयोग होत नाही. जगातील भूकंपांच्या नोंदी या यंत्रावर अद्ययावत व तपशीलवार पद्धतीने केल्या जातात. भूकंपाची ‘रिश्टर स्केल’मधील तीव्रता व किलोमीटरमधील केवळ अंतर दाखवले जाते. दिशा नाही. त्यामुळे भूकंपाच्या केंद्रबिंदूची दिशा काढण्यासाठी महाराष्ट्र भरातील प्रकल्पांवर असलेल्या यंत्रांचा एकत्रित ‘ग्राफ’ पाहूनच दिशा निश्चिती करावी लागते. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांच्या भूकंपमापक यंत्रांवरील दररोज होणाऱ्या नोंदींचा ग्राफ रोजच्या रोज नाशिक येथील ‘मेरी’ या संशोधन केंद्राकडे पाठवला जातो. तेथील संशोधक दिशानिश्चिती करून शासनाकडे अहवाल पाठवतात. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या जायकवाडी धरणावर अशा भूकंपमापक यंत्राची नितांत आवश्यकता आहे. मात्र राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.