
सिडको एन-१२ येथील कचरा ट्रान्सफर स्टेशनवर मशिनरी बसविण्याचे काम सुरू असताना ७ एप्रिल रोजी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ट्रान्सफर स्टेशनच्या कामात अडथळा आणला. तरी देखील प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल नगरसेवक राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी यांनी केला. या प्रश्नावर आयुक्तांनी उपायुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सभापती अनिल मकरिये यांनी चौकशी करून २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्रशासनाला दिले.
मनपा मुख्यालयातील प्रशासकीय सभागृहात स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, नगरसचिव नंदकिशोर भोंबे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच राजगौरव वानखेडे यांनी घनकचरा प्रकल्पामार्फत हडको एन-१२ मध्ये कचरा ट्रान्सफर स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. हे ट्रान्सफर स्टेशन २०१८ पासून कार्यान्वित आहे. परंतु, शहरातील कचरा उचलण्यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता त्रास झाला, असा सवाल करीत राजगौरव वानखेडे म्हणाले, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दहशत व नवीन एजन्सीला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कचरा ट्रान्सफर स्टेशनसह एन-८ रुग्णालय, मेल्ट्रॉन रुग्णालय येथे दादागिरी करीत गोंधळ घातल्याचा आरोप वानखेडे यांनी केला. ट्रान्सफर स्टेशन येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील हे नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामात अडथळा आणला. त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, जे कायद्याच्या नियमानुसार असेल ते केले जाईल. उपायुक्तांनी अडथळा झाला किंवा नाही याचा अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. चौकशी करून २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करावा, असे आदेश सभापती मकरिये यांनी दिले. यावेळी एमआयएमच्या नगरसेवकांना काहीही बोलता आले नाही.























































