IPL 2026 – रवींद्र जडेजाला गोलंदाजी का दिली नाही? कर्णधार रियान परागने दिले धक्कादायक स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामात सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना रंगला. हा सामना मराठमोळ्या प्रफुल हिंगे याने गाजवला. यासह राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयाचीही चर्चा रंगली आहे. संघात रवींद्र जडेजासारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू असतानाही रियान परागने त्याला एकही षटक टाकू दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. सामना संपल्यानंतर त्याने यावर स्पष्टीकरण दिले.

हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थानला महागात पडला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार ईशान किशन राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याच्या धास्तीनेच रियान पराग याने रवींद्र जडेजाला गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेतला.

जडेजाला गोलंदाजी न देण्याचा निर्णय सामन्यातील परिस्थिती पाहून घेतला होता. मधल्या षटकांमध्ये ईशान किशन जबरदस्त फलंदाजी करत होता आणि त्याला रोखण्यासाठी आम्ही कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतो. त्यामुळे मी त्याच रणनीतीवर ठाम राहिलो आणि गोलंदाजीमध्ये फारसे बदल केले नाहीत, असे रियान पराग यांनी सांगितले.

या लढतीत हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ईशानच्या 91, क्लासेनच्या 40 आणि नितीश कुमार रेड्डीच्या 28 धावांच्या बळावर हैदराबादने 4 बाद 216 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या या तोडफोड फलंदाजीबाबत विचारले असता रियानने याचे खापर खेळपट्टीवर फोडले. सुरुवातीला चेंडू वळत होता, पण नंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी झाली होती, असे तो म्हणाला.

दरम्यान, गोलंदाजीची संधी मिळाली नसली तरी रवींद्र जडेजाने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवले. त्याने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत फरेरासोबत 118 धावांची भागीदारी केली. मात्र 217 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 3 षटकांत 9 धावांवर 5 विकेट्स गमावल्यामुळे सामना राजस्थानच्या हातून तेव्हाच निसटला होता.