
इंडियन प्रीमयर लीगमध्ये मंगळवारी पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला हरवून चेन्नईचा संघ फॉर्मात आला आहे. पहिल्या तीन लढतींमध्ये फ्लॉप राहिलेल्या संजू सॅमसन यालाही सूर गवसला असून त्याने दिल्लीविरुद्ध शतकी खेळी साकारली. तसेच डेवाल्ड ब्रेव्हिसही संघात परतल्याने चेन्नईची मधळी फळी मजबूत झाली आहे. या लढतीत फिनिशर धोनी खेळणार की नाही याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवत चेन्नई सुपर किंग्जने विजयाचे खाते उघडले. मात्र आज मंगळवारी होणाऱ्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अजूनही निश्चित नाही. धोनी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो मंगळवारच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. पायाच्या दुखापतीमुळे त्याने या हंगामातील पहिले चारही सामने खेळलेले नाहीत.
संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. धोनी जरी मैदानात खेळत नसला, तरी संघावर त्याचा प्रभाव आजही तितकाच प्रबळ आहे. धोनी संघाच्या रणनीतीमध्ये आणि खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात सक्रिय सहभाग घेत आहे. धोनीने या हंगामात संघाच्या बाहेरच्या सामन्यांसाठी प्रवास करणे देखील टाळले असून तो लवकर मैदानात येण्यासाठी मेहनत घेत आहे.
महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील प्रवास अत्यंत यशस्वी राहिला असून 278 सामन्यांमध्ये त्याने 5,439 धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या हंगामात चेन्नईने चांगली कामगिरी केली नसली, तरी धोनीने मोलाचे योगदान दिले होते. आता चाहते त्याच्या मैदानावरील पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
IPL 2026 – तळ राखील तो बाहेर जाईल! चेन्नई-कोलकात्यात आज संघर्ष























































