हॉटेलमध्ये मुक्काम आणि जेवणासाठी वेटरचे काम; जैसलमेरमध्ये ब्रिटीश पर्यटकांचा अनोखा जुगाड, कोणत्या कामाची लाज नाही बाळगली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानातील सूर्यास्त आणि समृद्ध संस्कृतीसाठी पर्यटकांची जैसलमरला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळते. राजस्थानातील गोल्डन सिटी अशी ओळख असलेल्या या शहरात पर्यटनासाठी आलेल्या एका ब्रिटीश जोडप्याची जोरदार चर्चा आहे. पर्यटनासाठी आलेल्या या जोडप्याने भ्रमंतीसाठी जो मार्ग निवडला ते पाहून नेटकरीही थक्क झाले. आदित्य पटेल नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर जोडप्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आदित्य पटेल हा जैसलमेरमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेला होता. त्यावेळी त्याला दोन परदेशी पर्यटक हॉटेल कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेटरचे काम करताना दिसले. ते दोघेही टेबल साफ करत होते, प्लेट्स आणणे, नाश्ता वाढणे अशी कामं करत होते. त्यांच्या वागण्यावरून ना ते हॉटेलचे कर्मचारी वाटत होते, ना केवळ मौजमजेसाठी आलेले पर्यटक वाटत होते. त्यामुळे आदित्यने कुतूहलापोटी त्या दोघांशी संवाद साधला. यावेळी एक रंजक सत्य समोर आलं आहे. ही स्टोरी इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाली आहे.

हे जोडपे युकेहून जैसलमेरमध्ये पर्यटनासाठी आले होते. हॉटेलमधील राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी अनोखा मार्ग अवलंबला. ते दररोज चार तास हॉटेलमध्ये काम करतात. या कामाच्या बदल्यात त्यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोफत खोली आणि जेवण मिळते. उरलेल्या वेळेत ते जैसलमेरच्या गल्ल्यांमध्ये मनसोक्त भटकंती करतात. तिथली संस्कृती, नवीन कौशल्ये शिकतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जोडप्याच्या या संकल्पनेचे कौतुक केले आहे.