
बिहारमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार याबाबतचा सस्पेन्स मंगळवारी संपला. सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार असून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. बैठकीचे निरीक्षक केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतची घोषणा केली.
बिहारची राजधानी पाटणा येथील भाजप कार्यालयामध्ये केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात विधिमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विजय सिन्हा, मंगल पांडे आणि दिलीप जयस्वाल यांनी भाजप विधिमंडळ पक्षनेते म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. सम्राट चौधरी आजच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार असून बुधवारी 15 एप्रिल रोजी त्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
Samrat Choudhary elected as the Leader of the BJP Legislative Party in Bihar. pic.twitter.com/BKNbpwxSHv
— ANI (@ANI) April 14, 2026
कोण आहेत सम्राट चौधरी?
सम्राट चौधरी 1190 पासून राजकारणात सक्रिय असून त्यांची राजकीय कारकिर्दी राष्ट्रीय जनता दलपासून सुरू झाली होती. 1995 मध्ये त्यांना एका राजकीय प्रकरणात तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1999 मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते. 2000 आणि 2010 मध्ये ते परबत्ता विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. 2014 मध्ये त्यांनी जनता दल (यु) मध्ये प्रवेश केला. जीतन राम मांझी सरकारमध्ये ते शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री राहिले. 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2023 मध्ये त्यांची बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2025 मध्ये त्यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री, तर सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडेच गृहखात्याचीही जबाबदारी देण्यात आली होती.























































