
इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणाच्या लढतीत तीन फलंदाजांना शून्यावर बाद करणाऱ्या मराठमोळ्या प्रफुल हिंगे याची सध्या क्रीडाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या प्रफुल हिंगे यांने राजस्थान रॉयल्सची आघाडीची फळी कापून काढली.
भल्याभल्या गोलंदाजांचा समाचार घेणारा वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि हुआन ड्रे प्रटोरियस या तिघांना प्रफुलने आपल्या जाळ्यात अडकवले. प्रफुलने तिघांनाही भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे राजस्थानची अवस्था 1 बाद 3 अशी केविलवाणी झाली. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याचीही प्रफुलने शिकार केली. पदार्पणाच्या सामन्यात प्रफुलने 4 विकेट्स घेत धुमाकूळ घातला. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा क्रीडावर्तुळामध्ये रंगत आहे.
कोण आहे प्रफुल हिंगे?
सनरायझर्स हैदराबादने लिलिवात 30 लाखांची बोलू लावून आपल्या ताफ्यात घेतलेला 24 वर्षीय प्रफुल हिंगे मुळचा विदर्भातील आहे. उंचपुरा प्रफुल हिंगे चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करण्यात तरबेज असून त्याच्या चेंडूला चांगली उसळीही मिळते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो प्रभावी गोलंदाज ठरत आहे. आयपीएलमध्ये खेळण्याआधी त्याने देशांतर्गत क्रिक्रेटमध्येही आपली छाप सोडली आहे. विदर्भाकडून रणजी स्पर्धेत खेळणाऱ्या प्रफलने आतापर्यंत प्रथमश्रेणीचे 10 सामने खेळले असून यात त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत.
चार-पाच विकेट्स घेण्याचे आधीच लिहून ठेवले होते
दरम्यान, राजस्थानविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याला ड्रीम डेब्यूबाबत विचारण्यात आले. गेल्या वर्षी मी कुठेतरी लिहिले होते की जेव्हा मी माझा पहिला सामना खेळले तेव्हा नक्कीच चार-पाच विकेट्स घेईल. पॉवरप्लेमध्ये मला जास्तीत जास्त वर्चस्व गाजवायचे होते. माझा माझ्या क्षमतेवर पूर्व विश्वास आहे, असे म्हणत त्याने सामनावीरचा पुरस्कार कुटुंबाला समर्पित केला.
नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं
दरम्यान, राजस्थानचा गेम करणाऱ्या प्रफुल हिंगे याला नेटकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा आहे. हा सामना सुरू होण्याआधी प्रफुल हिंगे याचे इन्स्टाग्रामवर 6 हजारांच्या आसपास फॉलोअर्स होते. मात्र आता त्याचे फॉलोअर्स तब्बल 50 पटीने वाढून 2 लाख 86 हजारांवर पोहोचले आहेत.

























































