पिक्चर अभी बाकी है! पर्शियन आखातातील व्हिडीओ शेअर करत इराणचा अमेरिकेला बॉलिवूड स्टाईल इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात गेल्या दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. प्रचंड वित्तहानी आणि मनुष्यहानी झाल्यानंतर इराण-अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चा झाली. मात्र ही चर्चा फिस्कटली आणि तणाव पुन्हा वाढू लागला. चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकेने इराणची कोंडी करत होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल उद्ध्वस्त केल्याचाही दावा केला. यावर आता मुंबईतील इराणच्या दूतावासाने अभिनेता शाहरूख खान याच्या चित्रपटातील पिक्चर अभी बाकी है! हा प्रसिद्ध डायलॉग मारत अमेरिकेला इशारा दिला आहे.

इराणच्या दूतावासाने आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इराणच्या वेगवान क्षेपणास्त्र नौका समुद्रामध्ये युद्धाचा सराव करताना दिसत आहेत. या नौकांना पर्शियन आखातातील लाल मधमाश्या (Red bees of the Persian Gulf) असे म्हटले जाते. ट्रम्प दावा करत आहेत की इराणचे नौदल संपले आहे. पण आमच्या या लाल मधमाश्यांचा थवा जेव्हा हल्ला करेल, तेव्हा त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल, असा इशारा इराणने दिला आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असेही इराणच्या दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

इराणच्या दूतावासाने आणखी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. हा सर्व खेळ होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कुणाचे आहे याचा आहे. 1980 च्या दशकामध्ये भीषण युद्ध झालेले तेव्हाही इराणने तो मोक्याचा मार्ग सोडला नव्हता आणि सर्व गोंधळातही स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले. 2026 मध्ये संहिता तीच आहे, फक्त पात्र नवीन आहेत, असे म्हणत इराणच्या दूतावासाने ट्रम्प यांनी डिवचले.

काय म्हणाले होते ट्रम्प?

इराणचे नौदल पूर्णपणे संपले आहे. आम्ही त्यांची 158 जहाजे समुद्रात बुडवली आहेत. आता फक्त त्यांच्याकडे काही छोट्या ‘फास्ट अटॅक’ नौका उरल्या आहेत, ज्यांना आम्ही फारसे गंभीर मानत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच अमेरिकेच्या नाकेबंदीच्याजवळ येणाऱ्या कोणत्याही इराणी जहाजाला उद्ध्वस्त करण्याचा आदेशही त्यांनी दिला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांची नाकेबंदी मोडीत; धमक्या धुडकावत एका चिनी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली