डोनाल्ड ट्रम्प यांची नाकेबंदी मोडीत; धमक्या धुडकावत एका चिनी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये अमेरिकेने नाकेबंदी केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांची ही नाकेबंदी चीनने मोडीत काढली आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला होता. त्यानंतर आता चीनने अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता एका जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. त्यामुळे आता तणाव वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी जाहीर केलेली नाकेबंदी कमकुवत होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने निर्बंध लादलेला एक चिनी टँकर मंगळवारी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून गेला असल्याची माहिती शिपिंग डेटातून मिळाली आहे. अमेरिकेची नाकेबंदी असूनही या जहाजाने केलेल्या प्रवासामुळे अमेरिका-चीनमधील संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

मरीनट्रॅफिक आणि केप्लर डेटा दर्शवतो की, ‘रिच स्टारी’ हा चिनी टँकर, नाकेबंदी सुरू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करून बाहेर पडणारे पहिले जहाज ठरले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेने नाकेबंदी केल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर एका चिनी टँकरच्या या प्रवेशामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेच्या दबावानंतरही व्यापार पूर्णपणे थांबलेला नाही आणि ही नाकेबंदी निष्प्रभ ठरत असल्याचे दिसते.

हे चिनी जहाज 250,000 बॅरल मिथेनॉल घेऊन जात आहे. इराणसोबतच्या व्यापारामुळे अमेरिकेने या टँकरवर आणि त्याच्या मालक कंपनी, शांघाय शुआनरुन शिपिंग कंपनी लिमिटेडवर निर्बंध लादले होते. तरीही या जहाजाने होर्मुझमधून प्रवास केला आहे.

‘रिच स्टारी’ हा एक मध्यम आकाराचा टँकर असून तो अंदाजे २,५०,००० बॅरल मिथेनॉल वाहून नेत आहे. या जहाजाने संयुक्त अरब अमिरातीमधील हमरिया बंदरातून आपला माल भरला. या चिनी मालकीच्या टँकरवर चिनी कर्मचारी देखील आहेत. अमेरिकेने निर्बंध घातल्यानंतर दुसरा टँकर, ‘मुरलिकिशन’, देखील मंगळवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत दाखल झाला. हा रिकामा टँकर १६ एप्रिल रोजी इराकमध्ये तेल भरेल अशी अपेक्षा आहे. पूर्वी ‘एमकेए’ (MKA) म्हणून ओळखले जाणारे हे जहाज रशियन आणि इराणी तेल वाहून नेते.

अमेरिकेच्या लष्कराने सोमवारी इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू केली. त्यामुळे तेहरान संतप्त झाले आहे. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता वाढली आहे. तथापि, हे युद्ध कधी संपेल हे अद्याप स्पष्ट नाही. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे $100 च्या आसपास स्थिर आहेत.

पिक्चर अभी बाकी है! पर्शियन आखातातील व्हिडीओ शेअर करत इराणचा अमेरिकेला बॉलिवूड स्टाईल इशारा

इस्लामाबादमध्ये इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, करार करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाटाघाटी सुरू असून प्रगती होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सांगितले की, संघर्ष सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता गुरुवारी (१६ एप्रिल) चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सोमवारी एक नवीन दावा केला. त्यांनी सांगितले की, इराणने सोमवारी त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांना तडजोड करायची होती, परंतु तेहरानला अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी देणाऱ्या कोणत्याही कराराला ट्रम्प मान्यता देणार नाहीत. त्यामुळे आता तणाव निवळणार की चिघळणार, हे गुरुवारीच ठरणार आहे.