
मुंबईचे शांतीलाल जितिया, पुण्याचे अशोक जाधव, अल्ताफ मुजावर, रायगडचे सुनील गुरव यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या आयोजनाखाली सुरू झालेल्या 60व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष वयस्कर एकेरी गटात दमदार विजयी सलामी दिली. तब्बल 550 खेळाडूंचा सहभाग असलेल्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जितिया यांनी ठाण्याच्या गोविंद जवळकर यांचा 18-12, 25-0 असा एकतर्फी पराभव केला.
यंग फ्रेंड्स उपांत्य फेरीत
आयुष झिमरेच्या (2 विकेट आणि 52 धावा) उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यंग फ्रेंड्स क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्यावर 5 विकेट राखून विजय मिळवत इस्लाम जिमखाना आयोजित 76व्या सालारजंग निमंत्रित टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. इस्लाम जिमखान्यावर खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रविवारी प्रथम फलंदाजी करताना मुंबई पोलीस संघाचा डाव 19.4 षटकांत 123 धावांवर आटोपला.




























































