
इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे झालेली शांतता चर्चा फिस्कटली. त्यानंतर अमेरिकेने इराणची चौफेर नाकेबंदी करण्याची घोषणा केली. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या कडक लष्करी नाकेबंदीनंतर इराण वठणीवर आला असून तेहरानने पुन्हा एकदा करारासाठी अमेरिकेशी संपर्क साधला आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
आज सकाळीच आम्हाला इराणमधील महत्त्वाच्या लोकांचे फोन आले आहेत. ते कोणताही करार करण्यासाठी प्रचंड उत्सुक असून त्यांना लवकरात लवकर तोडगा हवा आहे, असा दावा डोनाल्ड टम्प यांनी केला. मात्र हे फोन कुणी केले याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
आम्ही अनेक गोष्टींवर सहमत झालो होतो. पण इराण अण्वस्त्रे बनवण्याची महत्त्वाकांक्षा सोडायला तयार नाही. जोपर्यंत इराण आपली अण्वस्त्रे बनवण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देत नाही, तोपर्यंत कोणताही करार शक्य नाही, असेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही आणि त्यांनी साठवून ठेवलेले युरेनियम परत घेऊ, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
VIDEO | Washington, DC: US President Donald Trump says, “… We agreed to a lot of things but they (Iran) didn’t agree to not having nuclear weapon… Iran will not have a nuclear weapon and we are going to get the dust (enriched Uranium) back. Either we will get it back from… pic.twitter.com/bLRMJBfkiY
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2026
ते पुढे असेही म्हणाले की, आम्ही एखाद्या देशाला जगाला ब्लॅकमेल करू देणार नाही आणि खंडणीही उकळू देणार नाही. इराण सध्या तेच करत आहे. आमही सौदी अरेबिया आणि रशिया या दोन्ही देशांच्या एकत्रित उत्पादनापेक्षा जास्त तेलाचे उत्पादन करतो. पुढील वर्षापर्यंत आम्ही आणखी उत्पादन वाढवू. त्यामुळे आम्हाला होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा फायदा नाही, पण जगाला त्याची गरज आहे.
VIDEO | Washington, DC: On the negotiations between US and Iran, US President Donald Trump says, “… We cannot let a country blackmail or extort the world, because that is what they are doing… We produce more oil than Saudi Arabia and Russia combined. By next year, we will… pic.twitter.com/XgzZ13nAN8
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2026
दरम्यान, होर्मुझची नाकेबंदी केल्यानंतर रविवारी प्रथमच एकाच दिवशी 34 जहाजे या भागातून सुरक्षितपणे बाहेर पडली, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. इराणचे नौदल आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून अमेरिकेने आतापर्यंत त्यांची 158 जहाजे नष्ट केली आहेत. जर इराणचे कोणतेही जहाज आमच्या नाकेबंदीच्या क्षेत्रात आले तर ते तत्काळ उद्ध्वस्त केले जाईल, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
इराणने दावा फेटाळला
इराणचे राजदूत मोहम्मद फताअली यांनी अमेरिकेचे दावे फेटाळत आपली भूमिका मांडली. जर अमेरिका आपल्या बेकायदेशीर मागण्या सोडणार असेल, तरच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. इराण शांततेसाठी तयार आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही युद्धाला घाबरतो. युद्धाचा कालावधी आणि त्याची व्याप्ती ठरवण्याची ताकद इराणकडे आहे, असे फताअली यांनी ठणकावून सांगितले.

























































