
आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांना जातीचे दाखले मिळावेत या व अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे दिवंगत उपनेते व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे तत्कालीन अध्यक्ष अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार व लाठीमारही केला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून अनंत तरे यांच्यासह 125 कोळी बांधवांची धुळे न्यायालयाने अखेर निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर धुळे न्यायालयाने निकाल दिला असून न्यायमूर्तींनी पोलीस यंत्रणेवर कडक ताशेरे मारले आहेत.
महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने 10 ऑगस्ट 2009 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. त्यात नंदुरबारचे भटू भाऊ पोलाद कुवर हे गोळी लागून शहीद झाले. तर शेकडो समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी निकाल देत अनंत तरे यांच्यासह त्यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोळी, मोर्चाचे आयोजक शानाभाऊ सोनावणे आणि अन्य 125 समाज बांधवांची निर्दोष सुटका केली.
या निर्णयामुळे कोळी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नेते शानाभाऊ सोनावणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आभार मानले आहेत.
यापुढेही संघर्ष करणार
न्यायालयाने दिलेला निकाल दिवंगत अनंत तरे व शहीद भटू कुवर यांच्या स्मृतीस अर्पण करत असून कोळी समाजाला न्याय देण्यासाठी यापुढेही संघर्ष करणार असल्याचे योगेश कोळी यांनी सांगितले. दरम्यान निर्दोष सुटका झाल्याबद्दल तरे परिवाराच्या वतीने कोळी यांचा सन्मान करण्यात आला. कोळी समाजाला न्याय देण्यासाठी आपण यापुढेही संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका महेश्वरी तरे, संजय तरे, विशाल तरे, सुनील भोईर, प्रथमेश जाधव आदी उपस्थित होते.


























































