Mumbai News – बोगस हॉल तिकीट दाखवून मुंबई पोलीस भरतीची परीक्षा देण्याचा प्रयत्न; भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोगस हॉल तिकिट दाखवून पोलीस भरतीची परीक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणीवर भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनल पिराजी पाटेकर असे आरोपी तरुणीचे नाव असून ती सोलापूरमधील रहिवासी आहे.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, 12 एप्रिल रोजी दादर पूर्व येथील नायगाव येथील गुरुनानक हायस्कूलमध्ये सकाळी 10 वाजता मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचे आयोन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी मिनल पाटेकर परीक्षा केंद्रावर आली. मात्र वर्गात न जाता ती स्वच्छतागृहात गेली. बराच वेळी बाहेर न आल्याने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार योगिनी पवार यांनी दरवाजा ठोठावला.

मिनलने आपली ओळख सांगत हॉल तिकिट दाखवले. हॉल तिकिट पाहून पवार यांनी तिला तिच्या सीट क्रमांकावर बसण्यास सांगितले. मात्र मिनल जेव्हा तिच्या सीटवर बसण्यास गेली असता तिथे आधीच उमेदवार बसली होती. याबाबत अधिक तपासणी केली असता ती जागा नूतन रामू हेगंडी या उमेदवाराची असल्याचे समजले. नूतनची बायोमॅट्रिक तपासणी आधीच झाली होती. यानंतर मिनलने आणलेले हॉल तिकिट बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी महिला पोलीस हवालदार योगिनी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 223, 329(3) आणि 336(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.