
जाहिरातीचे होर्डिंग दिसावे म्हणून झाडांची कत्तल केल्याचा प्रकार पनवेल शहरातील ऑक्सिपार्क या सार्वजनिक उद्यानात घडला आहे. तक्का पेट्रोल पंपासमोरील सिग्नलजवळ वर्दळीच्या भागात असलेल्या उद्यानातील पाच झाड्यांच्या झालेल्या कत्तलीची माहिती महापालिका प्रशासनाला नव्हती. त्यामुळे ही कत्तल पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने झाल्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
ऑक्सिपार्कमध्ये वाढलेल्या झाडांमुळे याच ठिकाणी असलेले एक जाहिरातीचे होर्डिंग पूर्णपणे झाकून गेले होते. हे जाहिरातीचे होर्डिंग प्रवाशांना स्पष्ट दिसावे, यासाठीच उद्यानात असलेल्या पाच झाडांची कत्तल करण्यात आली आहे, असा आरोप रोहित आटवणे आणि तुषार कापरे यांनी केला आहे. कत्तल करण्यात आलेल्या झाडांमध्ये चार तबुबिया आणि एक सप्तपर्णी अशा एकूण ५ झाडांचा समावेश आहे. या झाडांच्या अगदी मागे एक मोठे जाहिरातीचे होर्डिंग आहे. या झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे जाहिरातीचे होर्डिंग झाकले जात होते. आपली जाहिरात लोकांच्या नजरेस पडावी यासाठी संबंधित होर्डिंगमाल कानेच ही वृक्ष छाटणी केली असावी, असा प्राथमिक संशय तक्रारदाराने महापालिकेला दिलेल्या अर्जात नमूद केला आहे.
उद्यान विभागाने केला पंचनामा
ऑक्सिपार्कमधील झाडांची बेकायदा कत्तल झाल्याची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधीक्षक संदीप पवार, विवेक दळे, प्रवीण भोईर आणि नितीन बाबुळे यांनी तक्रारदार रोहित आटवणे व साक्षीदार तुषार कापरे यांच्या उपस्थितीत या घटनेचा पंचनामा केला. भररस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बागेतील झाडांची अशा प्रकारे छाटणी झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता याप्रकरणी दोषी असलेल्या होर्डिंगमालकावर महापालिका काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























































