
पावसाळ्यात माथेरान फिरण्यासाठी येणारे हजारो पर्यटक प्लास्टिक रेनकोटचा वापर करतात. मात्र परतीच्या प्रवासात हेच रेनकोट रस्त्यावर, दऱ्याखोऱ्यांत फेकले जातात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा बोजवाराच उडाला होता. याची गंभीर दखल घेऊन माथेरान नगर परिषदेने यापुढे प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी याच वर्षापासून केली जाणार आहे.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा आणि त्यातून होणारे नुकसान रोखण्यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर समितीने या मागणीची दखल घेत थेट बंदीच लागू करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी याच पावसाळी मोसमापासून केली जाणार आहे. विशेष म्हणजे, हे प्लास्टिक रेनकोट केवळ माथेरानमध्येच नव्हे तर नेरळ रेल्वे स्टेशन परिसरातही मोठ्या प्रमाणात टाकून दिले जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते.
आकर्षक आसन व्यवस्था
बैठकीत माथेरानच्या महात्मा गांधी रोडवर मॉल रोडच्या धर्तीवर पर्यटकांसाठी बसण्याची आकर्षक आसन व्यवस्था उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेचे सौंदर्यही वाढणार आहे. बैठकीस समितीचे सभापती शिवाजी शिंदे, समिती सदस्य तसेच प्रशासकीय अधिकारी समीर दळवी यांचीही उपस्थिती होती.


























































