
ट्रेकिंगदरम्यान चुकून जिवंत स्फोटकावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणाचे मित्र जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दुर्गम किंवा लष्करी सराव क्षेत्रांमध्ये परवानगीशिवाय न जाण्याचे आवाहन केले आहे. यामांग यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. तामिळनाडूच्या हनुमंतपुरम येथे ही घटना घडली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यामांग आपल्या पाच मित्रांसोबत हनुमंतपुरम येथे एका टेकडीवर ट्रेकिंगसाठी गेला होता. संरक्षण दलाकडून या टेकडीचा वापर टार्गेट प्रॅक्टिससाठी केला जातो. टेकडीवरून खाली उतरत असताना यामांगचा जिवंत स्फोटकावर पाय पडला आणि याचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे मित्र जखमी झाले. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.























































